Tue, Mar 26, 2019 01:48होमपेज › Konkan › बिबट्यांच्या मृत्यूमुळे व्याघ्र प्रकल्पाचा मुद्दा ऐरणीवर

बिबट्यांच्या मृत्यूमुळे व्याघ्र प्रकल्पाचा मुद्दा ऐरणीवर

Published On: Feb 03 2018 11:24PM | Last Updated: Feb 03 2018 10:58PMआरवली :  जाकीर शेकासन

नुकतीच संगमेश्‍वर तालुक्यातील करजुवे - धामापूर गावच्या सीमेवर जंगलात मृत बिबट्याचा सांगाडा मिळाल्याने सापडलेला सांगाडा हा बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की अनैसर्गिक कारणाने झाला, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसले तरी व्याघ्र प्रकल्पाचा प्रश्‍न  ऐरणीवर येत आहे. देशातील बिबट्यांची विद्यमान  संख्या जलदगतीने कमी होत चालल्याचे एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. बिबट्यांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकार भविष्यात प्रयत्नशील राहील याबद्दल पर्यावरणतज्ज्ञ आशावादी असले तरी महाराष्ट्रात विशेषत: कोकणामध्ये ‘अभयारण्य’च्या उभारणीच्या संदर्भातील चालढकल मात्र चिंता वाढविणारी आहे.
कोकणात दरवर्षी दहा ते बारा बिबटे  विविध प्रकारे मारले जातात, असे आकडेवारीवरून दिसत असले तरी प्रत्यक्षात ही संख्या त्याहून अधिक असल्याचे सांगितले जाते. गेल्या काही महिन्यांत कणकवली, रत्नागिरी, पनवेल, ठाणे या ठिकाणी बिबट्यांची कातडी विकताना पकडल्या गेलेल्या लोकांकडील कातड्यांच्या संख्येवरून हे अनुमान काढता येते.

साधारण दिवाळीपासून ग्रामीण भागात बिबट्यांच्या डरकाळ्यांनी त्यांचे अस्तित्व जाणवू लागते. हा बिबट्यांच्या नर-मादीच्या मीलनाचा काळ आहे. हा कालावधी संपला की उन्हाळा संपेपर्यंत बिबटे माणसांच्या नजरेस पडू लागतात. हे बिबटे अधूनमधून नागरी वस्तीत शिरून जीवितहानी करीत असतात व काहीवेळा स्वत:चा प्राणही गमावितात.  प्रचंड वृक्षतोड, अनधिकृत शिकारीमुळे रानडुकरं, ससे आदी लहान प्राण्यांची पर्यायाने बिबट्यांच्या खाद्यांची घटत चाललेली संख्या आदी कारणांनी ग्रामीण भागातील लोकांना बिबट्यांचा आता वाढता उपदव होऊ लागला आहे. 

कोकण -रेल्वेच्या उभारणीच्या वेळी व त्यानंतर विविध विकास कामांच्या नावाखाली कोकणात बेसुमार जंगलतोड झालेली आहे. रेल्वेचा मार्ग ज्या दर्‍या-डोंगरातून गेला, त्या भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले. मोठ-मोठे सुरूंग लावून डोंगरच्या डोंगर भुईसपाट करण्यात आले. त्यांच्या आवाजामुळे आसपासचा सारा परिसर हादरून जात असे. त्यामुळे सैरभैर झालेले वन्यजीव अन्नाच्या शोधात नागरीवस्तीकडे पळाले. त्यांना तेथे खाद्य मिळाले. त्यांची मनुष्यप्राण्याबद्दलची भीड चेपली आणि त्याचबरोबर उपलब्ध ‘चविष्ट खाद्या’चीही चटक लागली. मग ते तेथेच रेंगाळले. आता तर रेल्वेची वाहतूक दिवस-रात्र सुरू असते. तिच्या धडधडीमुळे आसपासचा सारा परिसर हादरून जातो. त्यामुळे घाबरलेले छोटे-मोठे प्राणी आपल्या ठिकाणाकडे परत फिरणे अशक्य झाले आहे.

या सार्‍या बाबी लक्षात घेतल्या तर सर्वच जंगली प्राण्यांसाठी संरक्षित क्षेत्र निर्माण करण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे. अशा पार्श्‍वभूमीवर संगमेश्‍वर तालुक्यातील ‘गोठणे’ येथील रेंगाळलेल्या अभयारण्यांच्या प्रकल्पांकडे सरकारी वन विभागाने तसेच अर्थ मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सरकारी आदेश जारी झाल्यावर गोठणे गावातील 50-60 कुटुंबियांनी शेजारच्या कोल्हापूर  जिल्ह्यात  स्थलांतरित होण्यास होकार दिला. तर 121 कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी सरकारने संगमेश्‍वर तालुक्यातील ‘हातीव’ येथे आठ हेक्टर 82 आर इतके क्षेत्र असलेली जागा निश्‍चित करून तेथे कामाला सुरुवातही केली. परंतु, ती कामे वेळेवर पूर्ण झाली नाहीत. दरम्यान, बराच कालावधी गेल्यामुळे अर्धवट पडलेली पूर्वीची सर्व कामे आता नव्याने करणे भाग पडणार आहे. ही कामे पूर्ण झाल्याशिवाय ‘व्याघ्र प्रकल्प’चे रेंगाळलेले काम मार्गी लागणे कठीण आहे.