Sat, Feb 16, 2019 03:09होमपेज › Konkan › ‘जैतापूूर’चा मुद्दा काँग्रेसची डोकेदुखी

‘जैतापूूर’चा मुद्दा काँग्रेसची डोकेदुखी

Published On: May 04 2018 10:35PM | Last Updated: May 04 2018 10:18PMराजापूर : प्रतिनिधी

नाणार प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याची गर्जना करणारा  काँग्रेस पक्ष  जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत असल्याने काँग्रेसचे धोरण देखील दुटप्पी असल्याची टीका आता होऊ लागली असून जैतापूरचा मुद्दा काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची लक्षणे दिसत आहेत .

बुधवारी सागवे येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या हल्लाबोल सभेत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्य प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी रिफायनरी प्रकल्प लादल्यामुळे विद्यमान शासनावर जोरदार शरसंधान साधले होते. मात्र, त्याचवेळी कोकणची राखरांगोळी करण्यासाठी आलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत ‘ब्र’ देखील काढला नव्हता .

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सभास्थानी आगमन होताच व्यासपिठाच्या बाजूलाच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पांतर्गत बाधित मच्छीमारांनी अशोक चव्हाण यांची भेट घेऊन अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना निवेदन दिले होते. ते अशोक चव्हाण यांनी स्विकारले व नंतर चर्चा करु, असे प्रकल्पग्रस्तांना अश्वासन दिले होते . 

सभा संपताच तेथून काही अंतरावरील एका घरी पत्रकार परिषद घेतली जाईल, असे सांगण्यात आले होते व तेथेच जैतापूर प्रकल्पग्रस्तांनी भेटावे, असा निरोपही त्यांना दिला गेला. मात्र, प्रत्यक्षात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी न येता ते परस्पर अन्य ठिकाणी रवाना झाले होते.  या पूर्वी काँग्रेसच्या कार्यकाळात जैतापूर प्रकल्प कोकणात आला होता  व त्या नंतर तो साम, दाम, दंड व भेद या नीतीने रेटण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी प्रशासन व आंदोलक यांच्यात अनेकवेळा संघर्ष घडला होता. प्रशासनाकडून धरपकड, अश्रुधूर सोडण्याचे प्रकार घडले होते.

एका आंदोलनादरम्यान तर पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात तबरेज सायेकर या आंदोलकाचा गोळी लागून मृत्यू झाला होता. पण तत्कालीन शासनकर्त्यांपैकी कुणीही  मयत तबरेजच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वन देखील केले नव्हते. 

या सर्व घटना काँग्रेस राजवटीत झाल्यामुळे त्या पक्षासाठी  जैतापूरचा मुद्दा  मोठी डोकेदुखी ठरणारा असल्याने काँग्रेस  जैतापूरच्या प्रकल्पग्रस्तांपासून दूर पळत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. नाणारवासियांना भक्कम साथ देणारा काँग्रेस जैतापूरपासून दूर पळत असल्याचे दिसत असून  काँग्रेसवरही आता दुटप्पीपणाचे आरोप होऊ लागले  लागले आहेत.