होमपेज › Konkan › जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अर्भक सापडले

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अर्भक सापडले

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 18 2018 9:09PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील प्रवेशद्वाराजवळ  शनिवारी सकाळी स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले. क्रौर्याची परिसीमा गाठताना या अर्भकाची नाळ दगडाने ठेचून, जन्मदात्रीपासून वेगळे करण्यात आले. या बालिकेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालय महापुरुष मंदिरासमोरील प्रवेशद्वाराच्या बाजूला या बालिकाला पायजम्याच्या एका पायामध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भाटकर नावाचे नागरिक मुख्य रस्त्यावरून जात असताना, पेट्रोल पंपासमोरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमधून रडण्याचा आवाज येत होता. भाटकर यांनी प्रवेशद्वाराजवळ डोकावून पाहिले असता, त्यांना एक अर्भक रडताना दिसले. त्यांनी परिसरातील नागरिकांना याची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर या अर्भकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या बालिकेला श्‍वास घेण्यास त्रास जाणवत होता. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी बालिका रक्‍तात माखलेली होती. तिची नाळ दगडाने ठेचण्यात आली होती. प्रकृती गंभीर असल्याने या नवजात बालिकेला बाल अतिदक्षता कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.  या बालिकेची प्रकृती स्थिर असल्याचे  डॉ. देवकर यांनी स्पष्ट केले. या नवजात बालिकेला टाकण्यात येण्यापूर्वी तासभर आधीच जन्म झाला असावा, असेही मत डॉक्टरांनी व्यक्‍त केले. याबाबत रत्नागिरी शहर पोलिस अधिक तपास करीत  आहेत.