Wed, Mar 20, 2019 08:33होमपेज › Konkan › #Women’sDayजगण्याचा हक्‍क देऊया

#Women’sDayजगण्याचा हक्‍क देऊया

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:43PMमनुष्याला जी माणूस म्हणून जगण्याचा हक्‍क देते ती एक स्त्रीच. लडिवाळ स्पर्शाने जी आई, आजी, बहीण, काकी, मामी, मावशी, आत्या, मैत्रीण, सखी, पत्नी, साक्षात देवी... अशा विविध रूपांत, नात्यात जन्म घेणारी स्त्री. आपल्या आयुष्यात ही महिलाच असतेच. ‘माणूस’ म्हणून जगण्याचा हक्‍क, अधिकार देणारी स्त्रीच असते.

अनेक शतकांपासून स्त्रीच्या जीवनात चूल आणि मूल हेच कार्यक्षेत्र आहे, असं सामान्यत: समाजात रूढ केलं गेलं. मानवी जन्मात तिला वेगळे अस्तित्व आहे. महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार्‍या मैत्रिणींचे खूप कौतुक होते. पण तिला काय हवं आहे? तिचे काय म्हणणं आहे? हे स्त्री मन कोण जाणतं का?

आजच्या किशोरी या उमलत्या वयाच्या कळ्याच आहेत. तिच्या मनातील भीती, अंधश्रद्धांचा पगडा, चुकीच्या परंपरा यावर लक्ष केंद्रीत करून प्रबोधन झाले पाहिजे. वयात येताना आपली आई, शाळेतील शिक्षिका, घरातील ताई, मैत्रिणींनी हिजगुज करून समजून घ्यायला हवं, ही अपेक्षा तिचीही असते. वयात येणार्‍या या उमलत्या कळीशी आईनेच मैत्री करावी, असे तिलाही वाटतं. बाबांसह घरातील सर्वांनीच तिला समजून घेतले तर...तिच्या जीवनात उद्भवणारे प्रश्‍न सुटण्यास मदतच होईल. मुलींच्या विचारांना प्राधान्य द्या, तिला समजून घ्या. बदलत्या जीवनशैलीत तिला, तिच्या मतांना प्राधान्य दिल्यास आपसुकच ती तुमची लाकडी लेक तुमच्याही मतांचा, विचारांचा आदर करील.

आज स्त्री शिकली; ती प्रगती पथावर पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहे. परंतु बाह्य जगापेक्षा घरात कर्त्या स्त्रीचा आदर होतो का? स्त्रीला मानसन्मान मिळायला हवा. स्त्री म्हणजे गुलाम, उपभोग्य वस्तू ही मानसिकता बदलायला हवी. तू मुलगी आहेस तुला हे करावेच लागेल. सर्वांनी सर्वच काम समजून घेऊन एकमेकांच्या विचारांना प्राधान्य देऊन केली तर सहज शक्य आहे. एखादी मुलगी रडलेली चालते, परंतु मुलगा रडला तर त्याला मुलगी आहेस का तू? असं बोलले जाते. स्त्रीला आपणच कमी लेखतो. 

हल्ली स्त्री भ्रुणहत्या वाढू लागलेय. गर्भलिंग निदानाचे वेड तर सुशिक्षित, अशिक्षित, उच्चशिक्षित सर्वच स्तरावर खोलवर रूजले आहे. प्रत्येकाच्या घरी वंशाचा दिवा हवाच...! यासाठी स्त्री गर्भ पाडले जातात. आजकाल मुलीही आईवडिलांचा आधार बनू लागल्या आहेत. वृद्धापकाळात आईवडिलांचा आधार बनू लागल्या आहेत. तरीही आजच्या आधुनिक युगात स्त्रीची ही अवहेलना पाहवत नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे.

-नीतांजली शिंगे-शिक्षिका