Sun, Aug 25, 2019 13:04होमपेज › Konkan › तेंडोलीतील गर्भवती महिलेचा अतिरक्‍तस्त्रावाने मृत्यू

तेंडोलीतील गर्भवती महिलेचा अतिरक्‍तस्त्रावाने मृत्यू

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 18 2018 11:06PMकुडाळ ः शहर वार्ताहर

तेंडोली-खरावतेेवाडी येथील सौ.वैदेही नारायण राऊळ (21) हिने कुडाळ ग्रामीण रूग्णालयात दोन गोंडस बाळांना जन्म दिला. मात्र  प्रसूतीपश्‍चात  मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव झाल्याने कुडाळ येथून गोवा-बांबोळी येथे तातडीच्या उपचारासाठी नेण्यात येत असताना वाटेतच गोवा-पेडणे येथे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. सिंधुदुर्गातील कुचकामी आरोग्य यंत्रणेचा वैदेही बळी ठरली असल्याचा आरोप स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

वैदेही राऊळ (पूर्वाश्रमीची  श्रद्धा  गोविंद गावडे, रा. माड्याचीवाडी) हिचा 7 नोव्हेंबर 2017 रोजी तेंडोली-खरावतेवाडी येथील नारायण राऊळ यांच्याशी विवाह झाला होता. सुखी संसाराची स्वप्ने पाहत असताना शुक्रवारी तिने कुडाळ ग्रामीण रूग्णालयात दोन जुळ्या गोंडस बाळांना जन्म दिला.प्रसूतीतज्ञ डॉ. प्रमोद वालावलकर यांनी तिची सिझर शस्त्रक्रिया यशस्वी केली. मात्र तिच्या शरीरात हिमोग्लोबीन व रक्‍त कमी असल्याने प्रसूतीपश्‍चात अतिरक्‍तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे तिला रक्‍त चढवण्याची नितांत गरज होती. जवळपास रक्‍ताच्या 10 बॅग्ज तातडीची गरज होती. मात्र तिचा रक्‍तगट  ‘ओ पॉझिटिव्ह ’ असलेले रक्‍तच सिंधुदुर्गांत आरोग्य यंत्रणेकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने डॉक्टरांसह नातेवाईकांची मोठी धावपळ झाली. ओरोसच्या जिल्हा रक्‍तपेढी व सावंतवाडी रक्‍तपेढीशी डॉ. वालावलकर यांनी स्वतः संपर्क साधून रक्‍ताची मागणी केली. सायंकाळपर्यंत केवळ 4 बॅग्ज रक्‍त उपलब्ध झाल्यावर ते चढवण्यात आले. डॉ. वालावलकर यांनी मोठे शर्थीचे प्रयत्न करीत उपचार सुरू केले.

मात्र,रुग्णालयात अतिदक्षता विभाग व व्हेंटीलेटरची सुविधा नसल्याने डॉक्टरांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यातच तिला असलेली रक्‍ताची गरज व रक्‍तस्त्राव कमी होत नसल्याने तातडीने गोवा-बांबोळी येथे हलविण्याचा सल्‍ला डॉ. वालावलकर यांनी नातेवाईकांना दिला. कुडाळमधून तिला जिल्हा रूग्णालयात हलविण्यात येणार होते. मात्र, तिथे आवश्यक सुविधा तसेच रक्‍त उपलब्ध नसल्याने गोवा येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथील 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेत व्हेंटीलेटर सुविधा नसल्याने ओरोस येथील 108 क्रमाकांची रुग्णवाहिका मागवून सौ. राऊळ यांना तातडीने उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात येत होते. मात्र शुक्रवारी रात्री 9 वा.च्या सुमारास गोवा-पेडणे दरम्यान वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून वैदेही हिचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही नवजात बाळांना कुडाळ येथील खासगी रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. या घटनेने राऊळ कुटुंबियांवर मोठा अपघात झाला असून गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्‍चात सासू-सासरे, पती, दीर व दोन नवजात मुलगे असा परिवार आहे. 

दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत शनिवारी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष दीपक नारकर, सभापती राजन जाधव, नगराध्यक्ष विनायक राणे, न.पं.बांधकाम सभापती ओंकार तेली, आरोग्य सभापती सौ. साक्षी सावंत यांनी डॉ. वालावलकर यांची भेट घेत चर्चा केली.