वेंगुर्ले ः वार्ताहर
भुजनागवाडी येथील लक्ष्मी भास्कर म्हाडदळकर या गरीब महिलेचे 2 महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी पावसात घर जमिनदोस्त झाले होते. लक्ष्मी म्हाडदळकर यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने तिला घर बांधणे अशक्य होते. शहरातील काही सेवाभावी व्यक्तींनी म्हाडदळकर हिच्यावतीने मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील दानशूर व्यक्तींनी तिला आर्थिक व वस्तुरुपात मदत केली. त्यामुळे तिचे जमिनदोस्त झालेले घर पुन्हा उभे राहिले. मंगळवारी या पूर्ण झालेल्या घराचा ताबा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते तिला देण्यात आला. नगरसेविका श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, सुषमा प्रभूखानोलकर यांच्यासह भुजनागवाडीतील गजानन किनळेकर, रमण किनळेकर आदी उपस्थित होते. गणेश चतुर्थीच्या अगोदर घर पूर्ण झाल्याने या घरात गुरुवारी गणपतीचे पूजन होणार आहे.