होमपेज › Konkan › रत्‍नागिरी : तामसतीर्थाची महती सर्वदूर

रत्‍नागिरी : तामसतीर्थाची महती सर्वदूर

Published On: May 03 2018 11:22PM | Last Updated: May 03 2018 11:03PMदापोली : प्रवीण शिंदे 

धार्मिक विधी आणि अस्थी विसर्जनासाठी अनेकजण विविध ठिकाणी समुद्रकाठी जातात. ही सगळी क्षेत्रे शिवतीर्थ म्हणून नावारुपास आली असून, त्यांची ख्याती सर्वत्र आहे. या तीर्थक्षेत्राइतकीच दापोली तालुक्यातील लाडघर या तामसतीर्थाचीही महती सर्वदूर होऊ लागली आहे. 

लाडघर या तामसतीर्थाला महत्त्वाचे स्थान दिले जात आहे.  लाडघर समुद्र किनार्‍याचा काही भाग उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तांबूस रंगाचा दिसतो. म्हणून या क्षेत्राला तामसतीर्थही म्हणतात. दापोली तालुक्यामध्ये अनेक किनारे हे पर्यटन क्षेत्र आहेत. मात्र, लाडघरचा समुद्रकिनारा आणि त्याचा काही भाग तांबूस असल्यामुळे दूरवरून येणार्‍या पर्यटकांची लाडघर समुद्र किनार्‍याला अधिक पसंती आहे.
या ठिकाणी दापोली तालुक्यासह जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अनेक नागरिक धार्मिक विधी आणि अस्थी विसर्जनासाठी लाडघर समुद्र किनारी येतात. एखाद्या व्यक्‍तीला अग्‍नी दिल्यानंतर अंत्य विधीसाठी आलेले लोक या समुद्र किनार्‍याच्या पाण्यामध्ये जावून समुद्राचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. 

लाडघर तामसतीर्थ हे दापोली शहरापासून 7 कि.मी. अंतरावर आहे. या क्षेत्राला पर्यटनाचा दर्जा प्राप्‍त झाला आहे. या क्षेत्राच्या बाजूला वडाचे झाड असून, समुद्रकाठालाच गोड्या पाण्याची विहीर आहे. हे देखिल एक आश्‍चर्य मानले जात आहे. 

हजारो रूपये खर्च करून दूरवरच्या तीर्थक्षेत्रांकडे जाणारी मंडळी आजही आहेत. मात्र, तामसतीर्थाची पाहिजे तेवढी ओळख अनेकांपर्यंत पोहोचली नसल्याने तामसतीर्थ फक्‍त तीर्थक्षेत्र म्हणून राहिले आहे.
या तामसतीर्थाच्या बाजूस पुरातन शिवमंदिर असून, या ठिकाणाहून काशीला जाण्यासाठी भुयारी मार्ग होता, असे देखिल येथील लोक अख्यायिका सांगतात. त्यामुळे लाडघर समुद्रकिनारा आणि काशी क्षेत्र यांची महती सारखीच आहे, असेही येथील जाणकार सांगतात. 

या मंदिराच्या शेजारीदेखिल गोड्या पाण्याचे कुंड आहे. लाडघर आणि तामसतीर्थ या दोन गावांच्या मध्यावर हे तीर्थक्षेत्र असून, लाडघर तामसतीर्थ असे देखिल या क्षेत्राचे नाव आहे.