Wed, Jan 29, 2020 23:45होमपेज › Konkan › ‘रिफायनरी’बाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी

‘रिफायनरी’बाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 11:03PM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

कोकणातील राजापूर तालुक्यात नाणार परिसरामध्ये प्रस्तावित  केंद्र शासनाचा पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याबाबत शासनाने अधिवेशन संपण्यापूर्वी भूमिका स्पष्ट करावी, असे निवेदन आमदार राजन साळवी यांनी उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांना दिले. या संदर्भात शासनाच्या भूमिकेकडे प्रकल्पग्रस्तांसह अवघ्या राजापूर तालुकावासीयांचे लक्ष वेधले आहे.

महत्त्वाकांक्षी पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेने विरोध केला असून, शिवसेनेनेही प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा देऊन विरोध दर्शविला आहे. त्या अनुषंगाने नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये शिवसेनेच्यावतीने विधिमंडळाच्या सभागृहाबाहेर निदर्शने करण्यात आली तसेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासून आ. राजन साळवीं यांनी लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा, अर्धा तास चर्चा यांच्या माध्यमातून  राजापूर तालुक्यातील पेट्रोकेमिकल रिफायनरी बद्दल स्थानिक जनतेची व प्रकल्पग्रस्थांची भूमिका मांडली.

त्या वेळी शासनाकडून समाधानकारक उत्‍तर न आल्याने तसेच नागपुर येथे उपोषण व आंदोलन केल्यामुळे पुन्हा एकदा राजापूरचे आमदार राजन साळवींनी या विषयावर ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेेशन’ या आयुधांद्वारे स्थानिक लोकांची भूमिका मांडून सरकारशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शासनाने या प्रकल्पा संबंधी चर्चा करण्यास विरोध दर्शवून ठोस भूमिका स्पष्ट केली नाही.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आ. साळवींनी पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याबाबत शासनाने आपली भूमिका अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात स्पष्ट करावी, असे निवदेन उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांना देऊन विनंती केली आहे.