Wed, Apr 24, 2019 15:52होमपेज › Konkan › वाकेड अपघातातील सातही मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 

वाकेड अपघातातील सातही मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 12 2018 10:32PMराजापूर : प्रतिनिधी

महामार्गावरील वाकेड अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तालुक्यातील कोंड्ये येथील सातजणांवर बुधवारी शोकाकुल वातावरणात एकाच स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.

गणेशोत्सवासाठी मुंबईतून राजापूर तालुक्यातील कोंड्ये गावी  निघालेल्या गणेशभक्‍तांच्या इको कारला  मंगळवारी  वाकेड येथे भीषण अपघात होऊन सातजण मृत्युमुखी पडले होते. लांजा तालुक्यातील वाकेड येथे एका खासगी आराम गाडीशी जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला होता.  या घटनेने कोंड्ये परिसरावर शोककळा पसरली होती. 

या अपघातात प्रियंका काशीराम उपळकर, पंकज हेमंत घाणेकर, भार्गवी हनुमंत माजळकर, मानसी हनुमंत माजळकर, राजेश बापू शिवगण, लवेश काशीराम उपळकर तसेच हनुमंत शंकर माजलकर यांचा मृतांमध्ये सामावेश होता.

बुधवारी दुपारी या सर्व मृतांवर एकाच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार राजन साळवी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यासहित नागरिक उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या आनंदासाठी उत्साहात गावी निघालेल्या कोंड्येतील गणेशभक्‍तांवर काळाने अचानक झडप घातल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे.