Mon, Apr 22, 2019 04:10होमपेज › Konkan › सावंतवाडीत कोकणातील पहिला मोनोरेल प्रकल्प

सावंतवाडीत कोकणातील पहिला मोनोरेल प्रकल्प

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 10:36PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

कोकणातील पहिला मोनो रेल प्रकल्प सावंतवाडी येथील शिल्पग्राममध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 1 कि.मी. लांबीचा हा प्रकल्प मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  सावंतवाडी येथील शिल्पग्रामला भेट प्रसंगी ते बोलत होते.

सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबनराव साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगांवकर, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, मोनोरेल विकासक, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. पालकमंत्र्यांनी शिल्पग्रामच्या कामाचा आढावा घेतला. तसेच या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांसाठी कोणत्या प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध असाव्यात याविषयीही सूचना केल्या. या शिल्पग्रामध्ये उभारण्यात येणार्‍या मोनोरेलची माहिती ना.केसरकर यांनी घेतली. या प्रकल्पासाठी 2 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या हा प्रकल्प निविदा स्तरावर असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. मे महिन्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय शिल्पग्राम या ठिकाणी कोकणातील संस्कृतीचे दर्शन पर्यटकांना व्हावे, यासाठी लोक कला, शिल्पकला यांचे दालन उभारण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. शिल्पग्राममध्ये कोकणच्या संस्कृतीचे प्रतिबिंब दिसावे असेही त्यांनी सांगितले. 

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नरेंद्र  डोंगर उद्यान प्रकल्पालाही भेट दिली. वन पर्यटन वार्षिक योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबविला जात असून या प्रकल्पासाठी वन विभागाला दीड कोटींचा निधी दिला आहे. या डोंगरावर वन क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची तरुण पिढीला माहिती देणारे केंद्रही असणार आहे. त्याशिवाय झाडावरील घरे, निसर्ग सानिध्यातील वास्तव्य, दोरीवरील झोपाळा असे निसर्गाशी एकरूप होणारे साहसी खेळ, पर्यावरण जागृती केंद्र, चालण्यासाठी ट्रॅक या सोयी उपलब्ध असणार आहेत. नव्याने निर्माण होणारा महामार्ग सावंतवाडी शहराच्या बाहेरून जातो. पण, त्यामुळे सावंतवाडीच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे  ना. केसरकर म्हणालेे.