Thu, Apr 25, 2019 03:49होमपेज › Konkan › चिनी वस्तूंवरील बहिष्कार केवळ फलकावरच; सामाजिक संस्थांचा विरोध मावळला

चिनी वस्तूंवरील बहिष्कार केवळ फलकावरच; सामाजिक संस्थांचा विरोध मावळला

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 18 2018 9:04PMरत्नागिरी : प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर येथील बाजारपेठ सजू लागली  आहे. हार-तुरे, मखरांनी बाजारपेठ सज्ज होऊ लागली आहे. मात्र, यावर्षीही चिनी वस्तूंवर बहिष्कार फक्‍त फलकावरच दिसणार का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. यावर्षी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सवासाठी चिनी बनावटीच्या वस्तू विक्रीसाठी दाखल होऊ लागल्या आहेत.

गेल्यावर्षी भारत-चीन देशांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर देशातील नागरिकांना चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन अनेक शहरांमधून करण्यात आले होते. जनजागृती फेरी काढण्यात आली होती. चौकाचौकांत चिनी वस्तूंवर बहिष्कार म्हणून फलक झळकवण्यात आले होते. विविध संस्थांच्या माध्यमातून बहिष्काराबाबत व्यापार्‍यांसह ग्राहकांना आवाहन करण्यात आले होते.

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यास त्याचा चीनवर दबाव येईल. कारण चीनची मोठी बाजारपेठ भारत आहे. हे लक्षात घेऊन गेल्यावर्षी जनजागृती करण्यात आली होती. मात्र, यावर्षी  ऐन गणेशोत्सव समोर असताना येथील बाजारपेठ चिनी वस्तूंनी सजू लागली आहे.

मखरे आणि विविध प्रकारच्या लाईट्स दाखल होऊ लागल्या आहेत. शहरातील विविध दुकानांमध्ये हार-तुरे, विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईचे साहित्य, आकर्षक मखरे, कापडी मखरे, थर्मोकोल आदी साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. या साहित्याने बाजारपेठेतील दुकाने सजू लागली आहेत. 

चिनी वस्तूंवर बहिष्कार केवळ फलकावरच राहिला आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. ग्राहक या वस्तूंना कशी पसंती देतात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. किमतीने कमी असलेल्या चिनी वस्तू अल्पजीवी ठरतात, तर दुसर्‍या बाजूला देशी बनावटीच्या वस्तू दर्जेदार असून त्या थोड्या खर्चिक ठरतात. त्यामुळे अनेकजण चिनी वस्तूंकडे वळत आहेत. त्यामुळे व्यापारीही विक्रीसाठी चायना वस्तूंना प्राधान्य देत आहेत. चायना वस्तूंवर बहिष्कार टाकून देशाभिमान जागवा, असे आवाहन यावर्षीही नव्याने केले जात आहे.