होमपेज › Konkan › जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढणार!

जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढणार!

Published On: Jul 31 2018 2:01AM | Last Updated: Jul 31 2018 1:45AMओरोस : प्रतिनिधी

चांदा ते बांदा या नावीन्यपूर्ण योजनेतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 95 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक व्यवसायाला आधुनिकीकरणाची जोड देऊन शाश्‍वत विकास करणे हे या चांदा ते बांदा या योजनेचे उद्दिष्ट आहे.

राज्याच्या दोन टोकांवर असलेल्या परंतु नैसर्गिक व्यवसायाने प्रगत असणार्‍या सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या जिल्ह्याचा शाश्‍वत विकास करण्यासाठी 9 जून 2016 रोजी सरकारने शासन निर्णय जारी केला.  ‘चांदा ते बांदा’ असे या योजनेला नाव देऊन पालकमंत्री तथा वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. 

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री केसरकर यांनी अधिकार्‍यांच्या मोठ्या प्रमाणावर बैठका घेतल्या. अखेर शासनाने खास सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चांदा ते बांदा योजनेतर्गत तब्बल 95 कोटी रुपये मंजूर करून ते प्राप्त देखील झाले आहेत. यातील मच्छीमारांना आऊटबोटसाठी 52 लाखांचे वाटप करण्यात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मच्छीमार व्यवसाय, काजू उद्योग, काथ्या व्यवसाय, शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. चंद्रपूर जिल्ह्यातही नैसर्गिक व्यवसाय व्यापक प्रमाणावर आहेत. या नैसर्गिक व्यवसायांना जर आधुनिकीकरणाची जोड देऊन शाश्‍वत विकास साधला तर हे दोन जिल्हे समृद्ध होऊ शकतील, म्हणून राज्यात चांदा ते बांदा ही योजना सुरू झाली. 

जिल्हा समन्वयकपदी धनवडे रूजू
 चांदा ते बांदा योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाने जिल्हा समन्वयकपदाची नियुक्ती केली  आहे. या पदावर जिल्हा समन्वयक म्हणून जी. एस. धनवडे हजर झाले आहेत. हे जिल्हा कार्यालय जिल्हा नियोजन विभागात आहे.