Sat, Dec 07, 2019 14:30होमपेज › Konkan › भाजप-सेना युती व्हावी ही जनतेची इच्छा : जठार

भाजप-सेना युती व्हावी ही जनतेची इच्छा : जठार

Published On: Mar 10 2018 11:02PM | Last Updated: Mar 10 2018 10:51PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपतर्फे इच्छुक असलेल्या उमेदवारांना 11 मार्चपासून भाजप कार्यालयात अर्ज उपलब्ध होणार आहेत.  ते त्यांनी भरून कार्यालयात सादर करावयाचे असून 15 मार्चला राज्यमंत्री रवींद्र यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती होवून त्याच दिवशी सायंकाळी नगराध्यक्षपदासह उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. यावेळी भाजपच्या प्रचार कार्यालयाचेही उद्घाटन होणार आहे. या निवडणुकीत भाजप-सेनेची युती व्हावी ही जनतेचीच इच्छा आहे. त्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न झाले तर दोन पावले मागे-पुढे होवू शकेल, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितले.

कणकवलीतील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, प्रवक्ते जयदेव कदम, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, यशवंत आठले, चारूदत्त देसाई आदी उपस्थित होते. जठार म्हणाले, भाजपचा नगराध्यक्ष व्हावा ही भूमिका ज्यांना मान्य आहे ते सोबत आल्यास त्यांचा विचार करू. गाव पॅनेलशीही आम्ही चर्चा केली. गाव पॅनेल जर समन्वयाने निवडणूक लढविण्यास तयार असेल तर तोही विचार केला जाईल. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने कणकवलीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठीच आम्हाला भाजपचा नगराध्यक्ष विराजमान व्हायला हवा. जर लोकांनी भाजपचा नगराध्यक्ष बसवून सहकार्य केले तर येत्या पाच वर्षात कणकवलीच्या विकासासाठी 100 कोटीेचा निधी उपलब्ध होवू शकेल, असेही जठार म्हणाले. कोकणसाठी काही करण्याची इच्छाशक्‍ती असलेले केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, या सरकारमुळे महामार्ग चौपदरीकरणाचे काम मार्गी लागले आहे. याशिवाय अनेक प्रकल्प होवू घातले आहेत. त्यामुळे विकासासाठी सर्वांना सोबत घेवून पुढे जावे ही आमची इच्छा आहे.जर संदेश पारकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून देत असाल तर शिवसेना भाजपशी युती करण्यास तयार आहे, असा प्रस्ताव यापूर्वी सेनेकडून भाजपला दिल्याचे समजते. त्याबाबत नक्की काय? असा प्रश्‍न विचारला असता प्रमोद जठार यांनी येत्या 15 तारीखला त्यादृष्टीने सकारात्मक निर्णय होईल, असे सांगत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी युवा नेते संदेश पारकर यांच्या नावाचे संकेत दिले. अर्थात हे चित्र 15 तारीखलाच स्पष्ट होणार आहे.