Mon, May 27, 2019 08:42होमपेज › Konkan › कापसाळमध्ये दारूबंदीचा निर्णय

कापसाळमध्ये दारूबंदीचा निर्णय

Published On: Dec 03 2017 1:07AM | Last Updated: Dec 02 2017 8:36PM

बुकमार्क करा

चिपळूण : वार्ताहर

तालुक्यातील कापसाळ येथे महिलांच्या एकजुटीमुळे दारूबंदीचा ठराव नुकताच मंजूर करण्यात आला आहे. एकता महिला समितीच्या माध्यमातून पुढे आलेल्या या विषयाला ग्रामपंचायतीने पाठिंबा दिला. त्यामुळे गावात दारूबंदीचा निर्णय यशस्वी झाला आहे. 

दारूबंदीचा ठराव मंजूर व्हावा यासाठी महिला एकता समिती आणि ग्रामपंचायतीने संयुक्तपणे गावात प्रभागवार बैठका घेतल्या. यामध्ये महिलांना ग्रामसभेचे महत्त्व पटवून देण्यात आले. समिती आणि ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनाला महिलांनी ग्रामसभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या सभेत गावात दारुबंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. 

महिला ग्रामसभेत झालेल्या निर्णयानंतर गावातील सर्वसाधारण ग्रामसभेत हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला. यावेळी गावात दारू व्यवसाय करणार्‍यांना बोलावून या ठरावाची माहिती देण्यात आली. तसेच दारूधंदे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ठरावानंतर दारू व्यवसाय सुरू राहिल्यास संबधितांवर ग्रामपंचायतीतर्फे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

एकता महिला समितीच्या माध्यमातून पुढे आलेला हा विषय पूर्णत्वास जाण्यासाठी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला. गावातील सर्व महिलांनी दारूबंदी निर्णयाचे स्वागत केले आहे.