Tue, Jul 23, 2019 02:15होमपेज › Konkan › वीज अभियंत्याचा मृतदेह काळसे नदीपात्रात

वीज अभियंत्याचा मृतदेह काळसे नदीपात्रात

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 11:15PMकुडाळ : वार्ताहर

महावितरणचे वालावल येथील सहाय्यक अभियंता युवराज चंद्रकांत पिंपळे (35, रा. माठेवाडा कुडाळ, मुळ-सोलापूर) यांचा मृतदेह अखेर  सहाव्या दिवशी काळसे येथे कर्ली नदीपात्रात आढळून आला. श्री. पिंपळे हे शुक्रवार 22 जून रोजी सकाळी  6 वा. कुडाळ येथील घरातून निघून गेले होते. त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

युवराज  यांची पत्नी वैशाली हिने  आपले पती स. 6 वा. पासून  बेपत्ता झाल्याची फिर्याद 22 जून रोजी कुडाळ पोलिस स्थानकात दिली होती. यानंतर त्यांच्या परिवारातील  सदस्य कुडाळ शहर परिसरात गेले सहा दिवस शोध घेत होते. अखेर बुधवारी सकाळी काळसे येथील ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह कर्ली पात्रात  तरंगत्या  स्थितीत  मिळून आला. यानंतर  त्यांचे वडील चंद्रकांत यांनी याठिकाणी जावून खात्री केली.  मुळ सोलापूर येथील युवराज  पिंपळे हे जून 2017 मध्येच  सिंधुदुर्ग जिल्ह्यात  प्रमोशनवर  बदली होवून आले होते. यानंतर त्यांना वालावल येथील सहाय्यक अभियंता पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. या पदाचा त्यांनी गेले वर्षभर  कार्यभार  सांभाळला होता. त्यांच्या पश्‍चात आई-वडिल, पत्नी, मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. 

पोलिस युवराज यांनी आत्महत्या केली की हा अपघाती मृत्यू आहे याबाबत  जोरदार तपास करत आहेत. युवराज घरातून बाहेर पडताना काही वाद झाले होते का? याचाही तपास पोलिस करत आहेत. एक वीज अभियंता असलेले युवराज नदीवर जावून वाहून जाण्याचा अपघात घडण्याची शक्यता कमीच आहे. काही कारणाने युवराज यांनी नदीच्या वाहत्या पाण्यात झोकून देवून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांना वाटते आहे. त्यामुळे त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.