Sat, Dec 14, 2019 01:59होमपेज › Konkan › जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघर

जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघर

Published On: Apr 08 2019 1:56AM | Last Updated: Apr 07 2019 8:43PM
रत्नागिरी ः प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी प्रस्तापित करण्यात आलेल्या 1730 मतदान केंद्रावर   महिला मतदारांसोबत आलेल्या लहान मुलांसाठी पाळणाघरासह  सहाय्यकाची सुविधाही उपलब्ध करुन देेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात 1730 पाळणाघराची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.  

लोकसभा  निवडणुकांकरिता मतदान केंद्रांवर  ‘अत्यावश्यक किमान सुविधांची’ संख्या या वर्षी दुप्पट करण्यात आली आहे. मेडिकल किट, मतदान केंद्रांवर सावलीची व्यवस्था, दिव्यांग  तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांच्या वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन या सुविधा या वर्षी नव्याने करण्यात येणार आहेत.

मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध उपाययोजना केल्या जातात. वाढत्या तापमानाची दखल घेताना मतदान केंद्रांवर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि महिलांसोबत असलेल्या लहान मुलांच्या उन्हापासून बचावाकरिता सावलीसाठी मंडप टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याचबरोबर मतदारांच्या सहाय्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केली जाणार आहे. त्यामध्ये राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट आणि गाइड विद्यार्थ्यांची मदत घेतली जाईल. हे विद्यार्थी मतदार रांगेचे व्यवस्थापन करण्याबरोबरच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी सहाय्य करतील. या स्वयंसेवकांसाठी पाणी आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला मतदारांसोबत आलेल्या लहान मुलांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणी एक प्रशिक्षित सहायक या मुलांची काळजी घेण्यासाठी नेमण्यात येणार आहे. 

प्रत्येक मतदान केंद्रावर तीन रांगा असतील. त्यामध्ये एक रांग पुरुषांसाठी, दुसरी महिलांसाठी आणि तिसरी ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांसाठी असणार आहे. 

रांगेतील दोन महिला मतदारांनी मतदान केल्यानंतर एका पुरुष मतदाराला मतदानासाठी आत सोडले जाईल. मात्र, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

अंध दिव्यांगांसाठी वाहन व्यवस्था

ज्या अंध आणि दिव्यांग  मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे माहिती देऊन मतदानासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी केली असेल अशा मतदारांसाठी घर ते मतदान केंद्र वाहनाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसेल तेथे खासगी वाहन भाड्याने घेऊन या मतदारांची ने-आण करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.