Thu, Nov 15, 2018 11:41होमपेज › Konkan › कुडाळातील जि.प.‘सीईओ’ निवासस्थानाला अवकळा!

कुडाळातील जि.प.‘सीईओ’ निवासस्थानाला अवकळा!

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 8:02PMकुडाळ ः वार्ताहर

कुडाळ शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जि. प.  सीईओं निवासस्थानाची  पूर्णतः दुरवस्था झाली आहे. याच्या देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाने पूर्णतः  दुर्लक्ष केल्याने हे निवासस्थान सरपटणार्‍या प्राण्यांचे वस्तीस्थान बनले आहे.  हे निवासस्थान झाडी झुडपांमध्ये  हरवले असून त्याला  अवकळा प्राप्त झाली आहे. एका बाजूने हे निवासस्थान कोसळत आहेत. शासनाने ही इमारत व जागा ताब्यात घेवून त्याजागी एखादा शासकीय प्रकल्प उभारण्याची मागणी करण्यात येत आहे.

कुडाळ शहरात मध्यवर्ती ठिकाणी हे निवासस्थान आहे. गेली 10 ते 12  वर्षे हे निवासस्थान विनावापर पडून आहे. त्यामुळे त्याची कोणतीही डागडुजी अथवा दुरूस्ती प्रशासनाकडून करण्यात आली नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी ई.रवींद्रन यांनी या निवासस्थानाची पाहणी केली. यावेळी हे निवासस्थान वापरात आणण्यासंदर्भात त्यांनी सा. बां. विभागाला प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या. या  इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाची  स्थिती, दुरुस्तीसाठी येणारा  खर्च या तपशीलासह अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्राथमिक पाहणीतच या इमारतीच्या  बांधकामाचा दर्जा खालावला असून याच्या दुरूस्तीसाठी बराच खर्च येणार असल्याचे निदर्शनास आले होते. या इमारतीच्या दुरूस्तीचा खर्च पाहता या इमारतीची  डागडुजी करण्याचे बारगळले. त्यामुळे  या इमारतीचा प्रश्‍न अंधातरीच   राहिला आहे. ही इमारत धोकादायक बनली असून पूर्णतः झाडी-झुडपांमध्ये हरवल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये आता सरपटणार्‍या प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. या इमारतीच्या आजूबाजूला अनेक कॉम्प्लेक्स, कार्यालये निवासस्थाने आहेत. त्यामुळे या सरपटणार्‍या  प्राण्यांपासून अनेकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देवून  ही इमारत  निर्लेखित करावी व आजूबाजूची झुडपे साफ करावीत,अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. 

तसेच या निवासस्थानातील सर्व वस्तूंचीही दुरवस्था झाली असून एका बाजूने ही इमारत कोसळत आहे. एकेकाळी सीईओंचे निवासस्थान असलेल्या या बंगल्याला आता अवकळा प्राप्त झाल्याने त्याचे राजवैभव हरवले आहे. या जागेतील अनेक झाडेही आता बरीच जीर्ण झाली आहेत.त्यामुळे ती मोडून या इमारतीवरच पडत आहे.त्यामुळे हा परिसर आता अधिकच भग्‍नावस्थेत जात आहे. प्रशासन याची  केव्हा दखल घेणार? असा प्रश्‍न नागरिकांमधून विचारला जात आहे.