Tue, Nov 20, 2018 11:09



होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात देशातील पहिले आयटी सेंटर : ना.केसरकर

सिंधुदुर्गात देशातील पहिले आयटी सेंटर : ना.केसरकर

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 24 2018 9:01PM



कुडाळ : शहर वार्ताहर 

सिंधुदुर्ग जिल्हा हा हुशार विद्यार्थ्यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ - मोठे अधिकारी बनावेत, यासाठी सावंतवाडी येथे एमपीएससी व युपीएससी सेंटर मंजूर करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाचे सागरी संशोधन (सिंधुस्वाध्याय) केंद्र लवकरच वेंगुर्लेत होणार आहे. शिवाय देशातील पहिले आधुनिक  आयटी सेंटर (डाटा सेंटर) सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या सहा महिन्यात कार्यान्वित होणार आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात निर्माण होणा-या शैक्षणिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन खूप शिकावे, मोठे व्हावे आणि जिल्हा, राज्य व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

शिवसेना जिल्हा प्रमुख  आ. वैभव नाईक व कुडाळ तालुका शिवसेना आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ रविवारी येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पार पडला. या प्रसंगी पालकमंत्री केसरकर बोलत होते. खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक, तालुकाप्रमुख राजन नाईक, महिला आघाडी प्रमुख सौ.जान्हवी सावंत, सभापती राजन जाधव, उपसभापती सौ.श्रेया परब, जि.प.सदस्य संजय पडते, नागेंद्र परब, अमरसेन सावंत, वर्षा कुडाळकर, सौ.अनुप्रिती खोबरे, पं. स. सदस्य जयभारत पालव, नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर आदींसह पदाधिकारी - कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

ना.केसरकर यांनी सुरवातीलाच गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता मोठी आहे. या जिल्ह्यातील विद्यार्थी जिल्ह्यातच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसीलदार अशा मोठ मोठ्या पदावर पोहोचावेत यादृष्टीने त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सावंतवाडी येथे एमपीएससी व युपीएससी सेंटर मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक तालुका या सेंटरला जोडली जाणार आहेत. झाराप येथे होणा-या मुंबई विद्यापीठ उपकेंद्रांत विविध  कोर्सेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सागरी संशोधनासाठी मुंबई विद्यापीठाचे सागरी संशोधन केंद्र लवकरच वेंगुर्ले येथे कार्यान्वित होणार आहे.  देशातील पहिले आधुनिक आयटी सेंटर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार असून मंजूरीची  कार्यवाही सुरू असून येत्या सहा महिन्यात हे सेंटर कार्यान्वीत होणार आहे. या केंद्रात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आयटी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले जीवन उज्ज्वल करावे. खा.राऊत, आ.नाईक व आपले नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही ना.केसरकर यांनी दिली.

आ.नाईक म्हणाले, विद्यार्थ्यांनी अतिशय खडतर परिश्रम घेऊन दहावी - बारावीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा मिळावी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी या हेतूने हा कार्यक्रम गेली चार वर्ष आयोजित केला जातो. अनेक अडचणींवर मात करून ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी एवढ्यावरच न थांबता विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा आणि मोठ मोठ्या अधिकारीपदापर्यंत झेप घेत नावलौकिक मिळवावा, असे त्यांनी सांगितले. जि.प.सदस्य श्री.पडते, श्री.परब, तालुकाप्रमुख श्री.नाईक, महिला आघाडी प्रमुख सौ.सावंत, सभापती श्री.जाधव, उपसभापती सौ.परब, वर्षा कुडाळकर, श्री.बंगे यांनी मनोगत व्यक्‍त करीत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी शहरी व ग्रामीण भागातील मिळून 275 गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अनंत पाटकर यांनी केले.

कौशल्य विकास योजना केंद्राला मंजुरी : खा.राऊत

खा.राऊत म्हणाले, शैक्षणिक सुविधांनी युक्‍त असलेल्या मुंबई - पुणे सारख्या शहरांना शैक्षणिक गुणवत्तेत मागे टाकण्याचे काम सिंधुदुर्ग - रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी केले आहे. संस्थाचालकांची मेहनत व शिक्षकांचे विद्यादानाचे प्रामाणिक काम यामुळे विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांचे हे यश कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात करीअर करून या संधीचे सोने करावे. झारापला होणा-या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात विविध कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. तसेच या जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे केंद्र मंजूर झाले असून लवकर कुडाळ किंवा कसाल येथे हे केंद्र कार्यान्वित होणार आहे, असे खा.राऊत यांनी सांगितले.