Mon, Aug 19, 2019 11:17होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांवरील खर्च महाराष्ट्र सरकार करणार : ना. केसरकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांवरील खर्च महाराष्ट्र सरकार करणार : ना. केसरकर

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 9:32PMसिंधुदुर्ग : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या रुग्णांवर गोवा राज्यातील बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार केले जातात त्या उपचाराचा खर्च महाराष्ट्र सरकार करणार आहे. वर्षाला दोन कोटी रुपयांचा निधी गोवा सरकारला देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वित्त राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

दैनिक ‘पुढारी’शी बोलताना ना. केसरकर यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या रुग्णांवर बांबोळी रुग्णालयात खर्च येतो तो वर्षाला दोन कोटी रुपयांपर्यंत येतो आणि हा खर्च महाराष्ट्र सरकारने गोवा सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे विधान परिषदेचे आ. रवींद्र फाटक यांनी विधिमंडळ अधिवेशनात हा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात विस्तृत माहिती दिली. 

गेले काही महिने हा प्रश्‍न गाजत आहे. परराज्यातील रुग्णांना गोवा-बांबोळी रुग्णालयात मोफत उपचार न देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. गेली अनेक वर्षे मोफत उपचार केले जात होते. त्यामुळे या नव्या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांमध्ये खळबळ उडाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुसज्ज शासकीय रुग्णालय नसल्यामुळे सिंधुदुर्गातील बहुतांशी रुग्ण गोवा-बांबोळी येथे उपचारासाठी जातात. गेले काही महिने गोवा सरकारने मोफत उपचार नाकारल्याने सर्वसामान्य व गरीब रुग्णांचे हाल झाले होते.

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गोवा सरकारमधील मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. परंतु, हा प्रश्‍न पूर्णपणे सुटला नव्हता. आता महाराष्ट्र सरकारनेच दोन कोटी रुपयांचा उपचारांचा खर्चच देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

URL : cost, patients, Sindhudurg district, borne, Maharashtra government, konkan news