Mon, May 25, 2020 22:54होमपेज › Konkan › कास गावातील देवस्थानाचा वाद पुन्हा उफाळला

कास गावातील देवस्थानाचा वाद पुन्हा उफाळला

Last Updated: Oct 09 2019 10:46PM
बांदा ः वार्ताहर

कास गावातील भाईप आणि पंडित यांच्यातील देवस्थान वादाने पुन्हा  डोके वर काढले आहे. सोमवारी रात्री उशिरा देवीची तरंगकाठी व कळस फिरवण्याच्या गोष्टीवरून हा वाद दसरोत्सवात पुन्हा एकदा उफाळून आला. सावंतवाडी तहसीलदारांनी गावात लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून पंडीत गटाने दसरोत्सव साजरा केल्याची तक्रार मडूरा महसूल मंडळ अधिकारी अशोक यशवंत पवार यांनी बांदा पोलिसांत दिली आहे. त्यावरून  भादंवि कलम 188 अन्वये नुसार बांदा पोलिसांनी 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून  कास येथील पंडित व भाईप यांच्यात श्री देवी माऊली व देव रवळनाथ देवस्थानातील तरंगकाठी व कळस फिरविण्याच्या  मानपानावरुन  वाद सुरू आहेत. मागील शिमगोत्सवात हा वाद समोर आला होता. त्या अनुषंगाने भाईप गटाने दिलेल्या अर्जानुसार सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात 27 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. यावेळी दसरोत्सव साजरा करण्यात एकमत झाले. मात्र, श्री देवी माऊली मंदिर, रवळनाथ मंदिर व गावात कळस फिरविणे या एका मुद्द्यावर वाद असल्याचे दिसून आले.

त्यानुसार 29 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान भाईप व पंडित गटाने गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखून दसरोत्सव साजरा करण्याचे आदेश सावंतवाडी तहसीलदारांनी दिले होते. तसेच तरंगकाठी व कळस फिरविण्यास मनाई आदेश दिला होता. मात्र, पंडित गटाने मनाई आदेश धुडकावत तरंगकाठी फिरविल्याचा भाईप गटाने आरोप केला होता. याबाबतची फिर्याद मडूरा महसुल मंडळ अधिकारी अशोक पवार यांनी बांदा पोलिसांत दिली आहे.

महसूल मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तहसीलदारांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी  भादंवि कलम 188 अन्वये पंडीत गटाच्या तब्बल 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली आहे. त्यात राजाराम दत्ताराम पंडित, विश्वनाथ सखाराम पंडीत, कृष्णा महादेव पंडीत, मनोहर हरी पंडित, घनश्याम राजाराम पंडीत, विठ्ठल जनार्दन पंडित, विश्‍वास भास्कर पंडीत, नकुल रामचंद्र पंडीत, सुरेश माम पंडीत, सुभाष शांताराम पंडीत, बाबली शिवराम पंडित, विजय रामकृष्ण पंडीत, वसंत गोविंद पंडीत व सत्यवान बलराम पंडीत यांचा समावेश आहे. चार दिवसांत सर्व संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

प्रशासनाच्या दुटप्पीपणामुळे गावात वाद!

गेली तीन वर्षें प्रशासन कार्यक्रमांना पूर्ण बंदी न घालता काही निकष लावून चालढकल करण्याचे काम करत आहे, प्रशासन नेहमीच गावात दुटप्पी धोरण राबवित असल्याने गावात वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे याचा नाहक त्रास भाईप गटाला होत आहे. उत्सवावेळी अटी-शर्थी लादून बंदी आदेश देण्यात येतो, त्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण होतात, देवस्थानातील होत असलेल्या वादाची पूर्ण कल्पना प्रशासनाला आहे, तरी त्याचे गांभीर्याने विचार करून सरसकट बंदी आदेश द्यावेत, नाहीतर कोणच्या दबावाखाली राहून काम करायचे असल्यास प्रशासनाने अन्यथा बंदी पूर्ण पणे उठवावी. मात्र, प्रशासन दुटप्पी भूमिका घेतल्याने गावात वाद निर्माण होत असल्याचा आरोप भाईप ग्रामस्थांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे केला आहे.