Tue, Apr 23, 2019 22:06होमपेज › Konkan › तेर्सेबांबर्डे ग्रामस्थांपुढे बांधकाम विभागाचे नमते

तेर्सेबांबर्डे ग्रामस्थांपुढे बांधकाम विभागाचे नमते

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 26 2018 10:18PMकुडाळ : वार्ताहर

तेर्सेबांबर्डे  रामेश्‍वर मंदिरनजीक कॉजवेवर बांधण्यात आलेल्या चुकीच्या संरक्षक भिंतीमुळे येथील शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर जि. प. बांधकाम विभागाच्या  अधिकार्‍यांनी घटनास्थळी पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई दिली. तेर्सेबांबर्डे ग्रा. पं. सदस्य रूपेश कानडे व ग्रामस्थांनी जि.प. बांधकामच्या अधिकार्‍यांना धारेवर धरल्यावर अधिकार्‍यांनी ही नुकसान भरपाई उपलब्ध करून दिली.

तेर्सेबांबर्डे-रामेश्‍वर मंदिर येथे मागील वर्षी कॉजवेवर सुमारे शंभर फूट लांबीची संरक्षक भिंत बांधण्यात आली. या संरक्षक भिंतीच्या वरील भागात शेतीक्षेत्र असून या शेतातून पावसाळ्यात मोठ्या स्वरूपाचा पाण्याचा प्रवाह वाहतो. मात्र, या प्रवाहाला रस्त्याच्या पलिकडे जाण्यासाठी योग्य सिमेंट पाईप न बसविल्यामुळे बरेच पाणी शेतातच तुंबते. हे तुंबलेले पाणी शेताच्या एका टोकाकडील बाजूने प्रवाहीत होते. पाण्याच्या या वेगामुळे व पाणी शेतात तुंबल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी वर्ग आक्रमक होत ही बाब येथील ग्रा.पं सदस्य रूपेश कानडे यांच्या निदर्शनास आणली. यानुसार जि.प. बांधकाम  विभागाच्या अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून देत त्यांना धारेवर धरले. शेतकर्‍यांनी नुकसानीपोटी 20 हजारांची मागणी बांधकाम विभागाकडे केली. बांधकाम विभागाने यानुसार शेतकर्‍यांना 12 हजार रू. सुपूर्द करत झालेली नुकसानी भरून काढण्याचा काहीसा प्रयत्न केला. तेर्सेबांबर्डे सरपंच संतोष डिचोलकर, उपसरपंच गुणाजी जाधव, रूपेश कानडे, आशा कोरगावकर यांसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.