Wed, May 22, 2019 20:17होमपेज › Konkan › राजापुरातील सेनेत सभापतिपदासाठी स्पर्धा 

राजापुरातील सेनेत सभापतिपदासाठी स्पर्धा 

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 9:58PMराजापूर : प्रतिनिधी

पंचायत समितीचे सभापती सुभाष गुरव यांचा पक्षांतर्गत तडजोडीनुसार सव्वा वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने शिवसेनांतर्गत सभापती बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, आगामी सव्वा वर्षासाठी शिवसेनेत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नाराजीचा फटका टाळण्यासाठी आणि गुरव यांनी वर्षभराच्या कालावधीत धडाकेबाज कामगिरी केल्याने त्यांनाच आणखी सव्वा वर्षांची मुदतवाढ देण्याचा सूर शिवसेनेत उमटत आहे. याबाबत खासदार विनायक राऊत आणि आ. राजन साळवी यांच्या निर्णयावरच सभापती बदलाच्या घडामोडी अवलंबून आहेत.

सभापतीपदासाठी पहिल्या अडीच वर्षांकरिता इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे आरक्षण आहे. शिवसेनेचे पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व असल्याने सेनेचे सदस्य असलेले अभिजित तेली, प्रशांत गावकर, प्रकाश गुरव असे तीन सदस्य सध्या सभापतीपदाच्या स्पर्धेत आहेत. या स्पर्धेतून नाराजी उद्भवू नये म्हणून गुरव यांना मुदतवाढ देण्याचा काही पदाधिकार्‍यांचा सूर आहे.  सभापती गुरव यांनी गेल्या वर्षभरात अनेक विकासकामांना चालना देतानाच ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी अनेक परिवर्तनवादी निर्णय घेतले आहेत. यामध्ये पंचायत समितीच्या आवारात महिला बालकल्याण समिती तसेच जिल्हा परिषदेचे बांधकाम उपविभाग कार्यालय आणणे, महावितरण कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे यासारख्या निर्णयांचा समावेश आहे.  जिल्हा नियोजनमधून राजापूर ग्रामीण रूग्णालयासाठी 27.5 लाख रूपयांची नळपाणी योजना मंजूर करणे, पंचायत समिती कार्यालयाची रंगरंगोटी करणे, आवारातील महापुरूष देवस्थानचे नूतनीकरण करणे, पं. समिती कार्यालय तसेच आवाराची स्वच्छता राखणे, गुरव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असलेली कार्यालयासह आवाराची 64 गुंठे जागा पंचायत समितीच्या नावावर करण्यात आली आहे.

प्रत्यक्षात ही जागा दोन एकर दहा गुंठे असून त्याबाबत देखील पाठपुरावा गुरव यांनी सुरू ठेवला आहे. पंचायत समितीकडील विखुरलेली कार्यालये एकाच छताखाली आणण्याच्या द‍ृष्टीने नव्या इमारतीचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठविण्यात आला आहे.  याशिवाय मुख्य रस्त्यावर पंचायत समितीच्या नावाच्या प्रवेशद्वाराचा प्रस्तावदेखील ठरावानंतर तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायतींना सतत भेटी देऊन त्यांना कामकाजासाठी तत्पर करणार्‍या गुरव यांनी तालुक्यातील बोगस डॉक्टरांची शोध मोहीम राबवून त्याला देखील आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. शौचालय अनुदानापासून वंचित राहिलेल्या काही लाभार्थीना पदरमोड करून वैयक्‍तिकरित्या शौचालय बांधण्यासाठी गुरव यांनी मदत केलेली आहे.  गुरव यांच्या कारकीर्दीत पंचायत समिती कार्यालयात येणार्‍या ग्रामीण जनता तसेच शेतकर्‍यांना मिळणार्‍या वागणुकीबद्दल समाधान व्यक्‍त केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरव यांना आणखी सव्वा वर्षांचा कालावधी वाढवून देण्यात यावा, असा एक सूर शिवसेना संघटनेत उमटला आहे. 

Tags : Konkan, competition, post, chairman, shivsena