Thu, Jul 18, 2019 08:16होमपेज › Konkan › गुहागर तालुक्यातील टँकरमुक्‍तीचा दावा खोटा

गुहागर तालुक्यातील टँकरमुक्‍तीचा दावा खोटा

Published On: Jun 07 2018 2:06AM | Last Updated: Jun 06 2018 8:53PMशृंगारतळी : वार्ताहर

मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोकणात काही ठिकाणी बरसल्या असल्या तरीही गुहागर अजून कोरडेच आहे. तालुक्यातील अनेक गावे टँकरच्या प्रतीक्षेत असून एक टँकर  2 गावांतील आठ वाड्यांची तहान भागवण्यास अपयशी ठरत आहे. मात्र, गुहागरात एकही पाण्याचा टँकर धावत नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा खोटा ठरला आहे.मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तालुक्यात काही ठिकाणी तुरळक बरसल्या. परंतु, अजून हवातसा पाऊस सुरू झाला नाही. शेतकर्‍यांनी आपल्या पेरण्या सुरू केल्या असून भातखाचरात कोळपणी व इतर कामे पार पाडली आहेत. पाऊस सुरू झाल्याशिवाय काही ठिकाणी शेतकरी पेरण्या सुरू करीत नाहीत.

दिवसभर कडक उन्हामुळे प्रचंड उकाडा निर्माण होत असून तालुक्यातील नदी, नाले कोरडे  झाले आहेत. नद्यांतून तर केव्हाच पाणी आटले असून विहिरीही खोल गेल्या आहेत.तालुक्यातील अनेक गावांतून पिण्याच्या पाण्याची टंचाई आता जाणवू लागली आहे. तालुका प्रशासनाकडे यापूर्वी 19 गावांतील 77 वाड्यांची पाणी टंचाईची मागणी नोंद झाली आहे. प्रत्यक्षात धोपावे व साखरीत्रिशुळ या गावांतील सर्व वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे.साखरी त्रिशुळच्या गवळवाडी, सुतारवाडी, बौद्धवाडी, गुरववाडी या वाड्यांना पाण्याचे अत्यंत दुर्भीक्ष असल्याने त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. धोपावे तरीबंदर, जाधववाडी, विघ्नहर्तावाडी, गुढेकरवाडी अशा दोन गावांतील आठ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.या पाणीपुरवठ्यासाठी एकच टँकर असून मोडकाआगर येथील  धरणातून पाणी उचलून टँकरमार्फत देण्यात येत आहे. टँकरने मिळणारे हे पाणी ग्रामस्थांना अत्यंत अपुरे पडत असून त्यामुळे येथील ग्रामस्थांचे पाण्याविना हाल होत आहेत. त्यामुळे मोठा पाऊस पडावा, अशी अपेक्षा रहिवाशांची आहे.

कागदावरील टँकरमुक्‍ती कशासाठी?

जिल्हा प्रशासनाच्यावतीने गुहागर तालुक्यातील एकाही गावात आणि वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, गुहागर तालुक्यात या उलट परिस्थिती असून सद्य:स्थितीत दोन गावांतील आठ वाड्यांत एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा गुहागरातील टँकरमुक्‍तीचा दावा फोल ठरला आहे. पाऊस सुरू झाला असला तरी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. एक टँकर अपुरा पडत असून आणखी टँकरची गरज आहे. परंतु, दुसर्‍या बाजूला प्रशासन गुहागरात एकही टँकर धावला नसल्याचे सांगत आहे.