Sat, May 30, 2020 11:55होमपेज › Konkan › ‘जलयुक्‍त’मध्ये ३८ गावांची निवड

‘जलयुक्‍त’मध्ये ३८ गावांची निवड

Published On: Aug 14 2018 1:07AM | Last Updated: Aug 13 2018 10:52PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात जलयुक्‍त शिवार योजनेमुळे 17 कोटी 29 लाख रुपये खर्च करून साडेचार हजार हेक्टर क्षेत्र सिंचनखाली आले आहे. यावर्षी या याजनेत 38 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तीन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. 

गेली तीन वर्षे जलयुक्‍त शिवार ही योजना राबवताना आतापर्यंत या योजनेतून 58 गावांमध्ये ही योजना राबविली आहे. त्यापैकी 52 गावात जलयुक्‍तची कामे पूर्ण होऊन 17 कोटी 29 लाख रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे साडेचार हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या वर्षी आणखी 38 गावांची निवड केली असून या गावात कामे पूर्ण झाल्यावर आणखी तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.
जलयुक्‍त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात 47 गावांत  ही योजना प्रायोगिक तत्वावर यशस्वी करण्यात आल्यानंतर गतवर्षी 58 गावांत ही योजना राबविण्यात आली होती. या  गावातील सुमारे  साडेचार हजार हेक्टर सिंचनाखाली आणण्यात आले. 

आता चालू अर्थिक वर्षात या योजनेंतर्गत  38 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रात जलयुक्‍त शिवारची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे.  यामध्ये पाणी स्रोतांचे समृद्धीकरण करणे, टंचाईयुक्त गावे टँकरमुक्‍ती करणे, जुन्या जलस्रोतांचे   बळकटीकरण करणे आदी कामे करण्यात येणार आहे. याचा फायदा 38 गावांतील रहिवाशांना होणार आहे. या कामांचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून 31 ऑगस्टपर्यंत या आराखड्याला मान्यता देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.