Wed, Jul 17, 2019 18:01होमपेज › Konkan › मुख्यमंत्र्यांनी नाणारला येऊनच अंतिम निर्णय घ्यावा

मुख्यमंत्र्यांनी नाणारला येऊनच अंतिम निर्णय घ्यावा

Published On: Apr 24 2018 11:17PM | Last Updated: Apr 24 2018 9:47PMराजापूर : प्रतिनिधी

कोकण व राज्यातील जनतेच्या हिताचा विचार करुन नाणारबाबत निर्णय घेऊ, अशी मुंबईत विधान करणारे मुख्यमंत्री नाणार प्रकल्प परिसरात प्रत्यक्ष जाऊन  तेथील वस्तुस्थिती  समजावून घेऊन प्रकल्पाबाबतचा अंतिम निर्णय का घेत नाहीत, असे सवाल आता उपस्थित केले जाऊ लागले  आहेत.

नाणार प्रकल्पाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सर्वच राजकीय पक्ष नाणारवरुन कुरघोडीचे राजकारण करीत आहेत. त्यातून स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या भावनांशी खेळ खेळला जात आहे. अलीकडच्या काळात शासनाने कुठलाही  प्रकल्प मार्गी लावताना तेथील भूमिपुत्रांची सत्तर टक्के सहमती असेल तरच तो मंजूर होतो, असा निर्णय घेतला असताना नाणार प्रकल्प नको म्हणून विरोधात असलेल्या सुमारे 76 टक्के प्रकल्पग्रस्तांनी आपली असहमतीपत्रे मुख्यमंत्र्यांनाच  सादर केलेली आहेत. शिवाय रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात होऊ नये म्हणून या प्रकल्प परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनीही विरोध करणारे ग्रामसभांचे ठरावही शासनाला सादर केले असतानादेखील नाणारचा प्रकल्प अजूनही राहिल्याने सखेद आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

या पूर्वी स्थानिक प्रकल्पग्रस्तांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाणारमधील फलोत्पादनासह, भातशेती, मच्छीमारी यांसह तेथील उपलब्ध रोजगार याची विस्तृत माहिती देऊन हा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील जर स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही, तेथील जनतेच्या शंकांचे निरसन करु, अशी भूमिका घेतल्याचे जाहीर झाले होते.

दरम्यान, सोमवारी सागवे येथे पार पडलेल्या सभेत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करीत असल्याची घोषणा केली होती. त्यावरुन चांगले वादंग उठले आहे. उद्योगमंत्र्यांनी तशी अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार नसून तो उच्चाधिकार समितीचा तो अधिकार असल्याचे विधान  मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमाशी करताना राज्य व कोकणच्या हिताचा विचार करुन नाणारबाबतचा निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले होते.

मुख्यमंत्री हे मुंबईत बसून विधाने करीत आहेत. प्रत्यक्ष नाणार परिसरात या प्रकल्पामुळे काय होणार आहे त्याची त्यांनी माहिती घ्यायला हवी, अशी मागणी प्रकल्पग्रस्त सातत्याने करीत आहेत. कोकणचे  खासदार विनायक राऊत यांनी तर मुख्यमंत्र्यांनी नाणारमध्ये यावे व तेथील परिस्थिती पहावी. जे चित्र दिसेल तसा  निर्णय घ्यावा, असे त्यांना आवाहन केले होते.पण, नाणार प्रकल्पांतर्गत जोरदार विरोध दिसत असल्यानेच कदाचित मुख्यमंत्री नाणार प्रकल्प परिसरात येत नसावेत, अशाही चर्चा आता सुरु झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे केवळ मुख्यमंत्रीच नाहीत तर राज्याचा गृहविभाग देखील त्यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्र्यांनी  जनतेच्या भावनांचा विचार करावा व नाणारमध्ये येऊन तेथील विरोधाची पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन  प्रकल्पाबाबतचा अंतिम निर्णय घेणे अवश्यक बनले आहे.