Wed, Jan 22, 2020 14:17होमपेज › Konkan › लोप पावत असलेल्या बुरूडकामातून कुटुंबाचा चरितार्थ

लोप पावत असलेल्या बुरूडकामातून कुटुंबाचा चरितार्थ

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 9:10PMदेवरूख : नीलेश जाधव

कलेला मरण नसते व ज्याच्या अंगी कला असते तो कधी उपाशी राहत नाही, असे म्हटले जाते. कलेला कष्टाची जोड असेल तर कला अवगत असलेल्या व्यक्‍तीला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतीच अडचण येत नाही,  हे देवरूखमध्ये राहणार्‍या बाजीराव जाधव यांनी दाखवून दिले आहे. बुरूडकाम करून आपल्या कुटुंबाचो चरितार्थ ते चालवत आहेत. नोकरी न मिळाल्याने हातपाय गाळणार्‍यांना त्यांनी चांगला आदर्श दिला आहे.

मूळचे कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकणंगले तालुक्यातील पारगाव या गावचे रहिवासी असणार्‍या बाजीराव जाधव यांना लहानपणासून बुरूडकामाची फार आवड आहे. त्यांना या बुरूडकामाचे बाळकडू त्यांच्या आई-वडिलांकडून मिळाले. नोकरी शोधण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आई-वडिलांनी सुरू केलेला बुरूडकामाचा परंपरागत व्यवसाय अखंडितपणे चालू ठेवण्याचा त्यांनी संकल्प केला. यानंतर ते आई-वडिलांना या कामात मदत करू लागले. बुरूडकामातून तयार झालेल्या ‘कणग्यां’ना कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात मागणी असल्यामुळे ते सुरूवातीला आई-वडिलांबरोबर या ‘कणग्या’ विकण्यासाठी जिल्ह्यात येत असत.

जिल्ह्यातील शेतकरी त्याकाळी कणग्यांमध्ये भात भरून ठेवत असत. त्यामुळे या कणग्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. या मागणीमुळे बाजीराव व त्यांचे आई-वडील तयार केलेल्या कणग्या विकण्यासाठी घेऊन येत असत. ठराविक हंगामाला या कणग्यांची विक्री होत असल्यामुळे या हंगामात कणग्यांची विक्री करून ते आपल्या घरी जात होते. त्यानंतर उर्वरित कालावधीत मिळेल ते काम करीत असत.बुरूडकामातून कायमस्वरूपी रोजगार मिळेल व कुटुंबाचा उदरनिर्वाहसुद्धा करता येईल. हे मनाशी पक्के केल्यानंतर त्यांनी कणग्यांबरोबरच करडोल, हारे, डालगी, परड्या, सुपं वळण्यावर अधिक भर दिला. ग्रामीण भागात या सर्व वस्तूंना चांगली मागणी असल्यामुळे ते विक्रीसाठी या तयार केलेल्या वस्तू गावोगावी घेऊन जात असतात. यातूनच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 

तीन मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी बाजीराव यांनी बुरूडकामात स्वत:ला वाहून घेतले आहे. बुरूडकामात बाजीराव यांना त्यांची पत्नी सावित्री यादेखील मदत करतात. त्यामुळे काम सोपे होते, असे बाजीराव आवर्जून सांगतात. हे काम अतिशय किचकट व वेळखाऊ स्वरूपाचे असल्याचे बाजीराव सांगतात.