होमपेज › Konkan › शासकीय कर्मचारी संपाबाबत मध्यवर्ती संघटना ठाम

शासकीय कर्मचारी संपाबाबत मध्यवर्ती संघटना ठाम

Published On: Aug 04 2018 10:55PM | Last Updated: Aug 04 2018 10:38PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सातव्या वेतन आयोगाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी शासकीय तसेच निमशासकीय कर्मचार्‍यांसह शिक्षक 7 ते 9 ऑगस्ट या कालावधीत राज्यव्यापी संपावर जाणार आहेत. या  आंदोलनाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मध्यवर्ती संघटनेच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात येणार असून संघटना तीन दिवसांच्या संपावर ठाम असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रुपेंद्र शिवलकर यांनी दिली.

शासकीय कर्मचार्‍यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होईल, असे आश्‍वासन शासनाकडून अनेकदा देण्यात आले होते. सातव्या वेतन आयोगासह अन्य प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेबाबत राज्य शासन केवळ आश्‍वासने देत आहे. आश्‍वासनांची पूर्तता न केल्याने कर्मचार्‍यांमधील नाराजी अधिकच वाढली आहे. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, अंशदायी पेन्शन योजना रद्द करा, महागाई भत्त्यात वाढ, निवृत्तीचे वेतन 60 वर्षे करा, रिक्त पदे तत्काळ भरा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवा, आदी मागण्यांच्या पूर्ततेबाबत राज्य शासनाची उदासीनता झटकण्यासाठी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात करण्यात येणार्‍या संपाची तयारी करण्यात आली आहे. 

या संपात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांसह शिक्षक संघटनाही सहभागी होणार आहेत. संघटनेतर्फे या पार्श्‍वभूमीवर निदर्शने, ठिय्या आणि लेखणी बंद आंदोलन करण्यात आली असून  आता तीन दिवसांच्या संपाचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान,  या  जिल्हा  प्रशासनालाही याबाबत निवेदन देण्यात आले आहे.  या कालावधीत सर्व शासकीय कार्यालयात जेवणाच्या सुट्टीत निदर्शने सुरू करण्यात आली असून मध्यवर्ती संघटनेचा संप करण्याबाबतचा निर्धार कायम असल्याची माहिती संघटनेचे सचिव विलास केळकर यांनी दिली.