Sun, Mar 24, 2019 13:12होमपेज › Konkan › मंत्र्यांच्या ताफ्यातील कारची धडक बसून पोलिस कर्मचारी जखमी

मंत्र्यांच्या ताफ्यातील कारची धडक बसून पोलिस कर्मचारी जखमी

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 10:50PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा ताफा येत असताना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून इशारा करून वाहतूक रोखून धरणार्‍या वाहतूक पोलिसाला भरधाव कारची धडक बसली. या अपघातात वाहतूक शाखेचे पोलिस नाईक सुरेंद्र शिंदे जखमी झाले. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास माळनाका येथे ही घटना घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेंद्र शंकर शिंदे (45) हे वाहतूक पोलिस शुक्रवारी सकाळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौर्‍यानिमित्त वाहतूक नियंत्रणासाठी माळनाका येथील शासकीय विश्रामगृहासमोर तैनात होते. याचवेळी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ना. चव्हाण यांच्या गाड्यांचा ताफा मारुती मंदिरकडून माळनाका येथील शासकीय विश्रामगृहाकडे येत असताना वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेल्या वाहतूक पोलिस शिंदे यांनी बसस्थानकाकडून मारुती मंदिरकडे जाणारी वाहतूक इशारा करून रोखून धरली होती.

मंत्र्याच्या गाड्यांचा ताफा जात असतानाच अचानक एक इको कार (एम.एच -08-0946) ही भरधाव वेगाने अचानक पुढे आली. हाताच्या इशार्‍याने वाहतूक रोखून धरणार्‍या वाहतूक पोलिस शिंदे यांना या कारची धडक बसून ते जखमी झाले. जखमी अवस्थेत त्याना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद शहर पोलिस स्थानकात करण्यात आली असून याचा पुढील तपास पो. ना. सावंत करीत आहेत.

URL : car, hit, policemen, injured, konkan news