Sat, Jul 20, 2019 23:22होमपेज › Konkan › खेडवासीयांना नवीन करवाढ नाही

खेडवासीयांना नवीन करवाढ नाही

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 8:46PMखेड : प्रतिनिधी

खेड नगरपरिषदेचा सन2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प दि.28 रोजी झालेल्या खास सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला. सुमारे अडीच कोटी रूपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या करवाढीचा उल्लेख नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. स्थायी समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पाच्या आराखड्यात या खास सभेत शिवसेना गटनेत्यांच्या विनंतीनुसार अनेक बदल करण्यात आले असून त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे.

खेड न. प.चा अर्थसंकल्प 2018-19 दि.28 रोजी झालेल्या पालिकेच्या खास सभेत मांडण्यात आला होता. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष वैभव खेडेकर होते. न.प. च्या स्थायी समितीने तयार केलेल्या अर्थसंकल्पात बदल करत असताना नमूद केलेल्या अंदाजपत्रकामध्ये नवीन खांब टाकणे या लेखाशिर्षाखाली 10 लाखांची तरतूद करण्यात आली. नगरपरिषद सभागृह तसेच अध्यक्ष व मुख्याधिकारी दालन दुरूस्त करण्यासाठी 75 लाखांची तर सफाई कर्मचारी वसाहत दुरूस्तीसाठी 30 लाखांची तरतूद केलेली आहे. बॅडमिंटन कोर्ट, व्यायामशाळा यासाठी 5 लाख  रुपये, दवाखाना इमारत दुरूस्तीसाठी 25 लाख, तर दवाखाना औषधे खरेदीसाठी 5 लाख 10 हजार, नाट्यगृह दुरूस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बदलांसह तयार झालेल्या अर्थसंकल्पाला सभागृहात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

खेड न. प.च्या अर्थसंकल्पात सुमारे 24 कोटी 53 लाख 66 हजार 192 इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. त्यामध्ये महसुली जमा 9 कोटी 74 लाख 81 हजार तर भांडवली जमा 12 कोटी 86 लाख 45 हजार 192 इतका अपेक्षित धरण्यात आला आहे. महसुली खर्च 10 कोटी 15 लाख 57 हजार इतका असून भांडवली खर्च 10 कोटी 50 लाख इतका अपेक्षित आहे.  त्यामुळे 22 कोटी 52 लाख 67 हजार इतका खर्च या अर्थसंकल्पात अपेक्षित धरण्यात आला आहे. 

या अर्थसंकल्पात विविध स्वरूपाचे कर, अनुदान भाडे आदींच्या माध्यमातून उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. अर्थसंकल्प मंजुरीसाठी आयोजित करण्यात आलेल्या खास सभेला मुख्याधिकारी महादेव रोडगे, शिवसेना गटनेते बाळा खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, शहर विकास आघाडी गटनेते अजय माने, प्रज्योत तोडकरी, इलियास खतीब, भूषण चिखले, दिनेश पुजारी, आदींसह सर्व सदस्य उपस्थित होते. न. प.च्या विविध खात्यांचे प्रमुख व लेखापाल संजय आपटे यांची यावेळी उपस्थिती होती.