Fri, May 24, 2019 08:27होमपेज › Konkan › वाल्मिकीनगर ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

वाल्मिकीनगर ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 09 2017 8:39PM

बुकमार्क करा

मंडणगड : प्रतिनिधी

अनुसूचित जमातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र  मिळत नसल्याने वाल्मिकीनगर ग्रामपंचायतीमधील चार प्रभागांचे आरक्षण बदलण्याच्या 2011 पासूनच्या ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी निवासी नायब तहसीलदार संजय कांबळे यांना निवेदन दिले आहे.

दरम्यान, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या ग्रामस्थांच्या निर्णयामुळे  वाल्मिकीनगर  ग्रा.पं.त इतर मागास प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या अन्य तीन प्रभागांच्या निवडणुकांसाठी गावातून कोणीही निवडणूक नामनिर्देशन पत्र न भरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम संपूर्ण निवडणूक कार्यक्रमावर होणार आहे. प्रतिकूल आरक्षणामुळे गेली पंधरा वर्षे या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडून चालविला जात आहे. 

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, सन 2011 ते 2017 या कालावधीत वाल्मिकीनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुन्या आरक्षणाच्या आधारे लावण्यात आल्या. गावातील चार प्रभागांत असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणास पात्र असलेला एकही उमेदवार गावात नाही. त्यामुळे अनुसूचित जमातीसाठी राखीव चार प्रभागास विशेष मागास प्रवर्गाकरिता खुले करावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी राज्य निवडणूक आयोगाकडेही पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रभागांचे आरक्षण बदलण्यासाठी महसूल व प्रशासकीय यंत्रणाकडून पाठपुरावा न झाल्याने वेळोवेळी जुन्या निकषांच्या आधारे आरक्षण जाहीर होते व ग्रामस्थ निवडणुकांपासून वंचित राहतात. त्याचा परिणाम गावाच्या विकासावर झाला आहे. 

ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 व 30 आणि मुंबई ग्रामपंचायत अधिनयम 199 मधील नियम 4 अ मधील तरतुदींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चार प्रभागांचे आरक्षण विशेष मागास प्रवर्गासाठी  खुले करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. 26 डिसेंबरला होत असलेल्या निवडणुकीकरिता अनुसूचित जमातीची जागा विशेष मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्याची मागणी मान्य न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी रत्नागिरी, उपविभागीय अधिकारी दापोली यांच्यासह निवडणूक अधिकारी वाल्मिकीनगर यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. 

निवेदनावर जर्नादन कुलापकर, अशोक चोगले, भालचंद्र पाटील, दिलीप होळकर, देवेंद्र पाटील, आत्माराम पालेकर, जनार्दन मेंदारकर, रेमेश किल्लेकर, हेमंत चोगले, संतोष होळकर, मोहन पाटील यांच्यासह 185 ग्रामस्थांची स्वाक्षरी आहे.