Mon, Apr 22, 2019 21:46होमपेज › Konkan › बेपत्ता युवकाचा मृतदेह वायंगणी समुद्रात

बेपत्ता युवकाचा मृतदेह वायंगणी समुद्रात

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 10:43PMमालवण/वेंगुर्ले : प्रतिनिधी

गेले दोन दिवस बेपत्ता असलेल्या दाभोली-गावडेवाडी येथील संतोष विष्णू गावडे (वय 30) याचा मृतदेह शनिवारी सकाळी वायंगणी जि.प. शाळेच्या पाठीमागे समुद्र किनार्‍यावर आढळून आला. यासंदर्भात त्याचा भाऊ विश्‍वास गावडे यांनी वेंगुर्ले पोलिसांत खबर दिली असून, याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. दरम्यान, मालवण बंदरजेटी परिसरात शनिवारी सकाळी अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. हा मृतदेह 35 ते 40 वर्षे वयोगटातील आहे. मृतदेहाच्या दोन्ही डोळ्यातून रक्तस्राव होत असल्याचे दिसत होते. यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. हा मृतदेह मालवण पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. दरम्यान, हा घातपात की आत्महत्या, असा प्रश्‍न चर्चेतून विचारला जात होता.

संतोष गावडे हा गुरुवार 12 जुलै रोजी सकाळी 6.30 वा. दाभोली-मोबारवाडी येथील संदीप पाटील यांच्या घरी कामास जातो, असे सांगून गेला होता. तो त्या दिवशी 
रात्रौ उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याचा भाऊ विश्‍वास विष्णू गावडे याने 13 जुलै रोजी तो बेपत्ता असल्याची खबर वेंगुर्ले पोलिसात दिली होती. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक मिलिंद कुंभार, हवालदार परब यांनी चालू केला होता. शनिवारी सकाळी 6.30 च्या दरम्यान वायंगणी येथील ग्रामस्थ रिचर्ड यांना वायंगणी शाळेच्या पाठीमागील समुद्र किनारी संतोष याचा मृतदेह दिसून आला. त्याने त्याची खबर संतोष गावडे यांचे शेजारी शेगले याना फोन करून दिली. शेगले यांनी विश्‍वास गावडे यांना याची खबर देताच विश्‍वास गावडे व त्यांच्या शेजार्‍यांनी वायंगणी समुद्र किनार्‍यावर धाव घेतली व मृतदेहाची ओळख पटल्यावर त्याची खबर वेंगुर्ले पोलिसांत दिली. वेंगुर्ले पोलिसात मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अधिक तपास वेंगुर्ले पोलिस निरीक्षक शशिकांत  खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मिलिंद कुंभार व अच्युत परब करत आहेत.

शनिवारी सकाळी मालवण बंदरजेटी येथील समुद्रात अज्ञात महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिक मच्छीमारांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तत्काळ मालवण पोलिसांना माहिती दिली.पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर, हवालदार निलेश सोनावणे, संतोष गलोले, गंगा येडगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. 

ही महिला शुक्रवारी सायंकाळी मालवण बाजारपेठ येथे फिरत असल्याचे काही नागरिक, व्यापार्‍यांनी पाहिले होते. तर शहरातील एका हॉटेलमध्येही चहा पिण्यासाठी थांबली होती, असे बोलले जात होते. दरम्यान, ही महिला स्थानिक नसल्याने पोलिसांनी पर्यटक असल्याचा शक्यता वर्तवली आहे. कोणाच्या हॉटेल, लॉजवरून महिला बेपत्ता झाली असल्यास मालवण पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा,असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी अधिक तपास मालवण पोलिस करत आहेत.