Wed, Jul 24, 2019 14:10होमपेज › Konkan › ‘फिनोलेक्स’ला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

‘फिनोलेक्स’ला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

Published On: May 18 2018 11:16PM | Last Updated: May 18 2018 11:03PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

कम्युनिकेशन मल्टीमीडिया अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर (सी.एम.ए.आय.) असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा भारतातील ग्रामीण विभागातील उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय 2018 हा पुरस्कार यावर्षी फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने मिळवला आहे. सी.एम.ए.आय. ही संस्था मोबाईल, दूरसंचार, शिक्षण तसेच उत्पादन या क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेमार्फत दरवर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विविध गुणात्मक बाबी - शिक्षक व शिक्षणाचा दर्जा, प्लेसमेंट, उद्योग जगताशी असलेला सहयोग, पायाभूत सुविधा इ.च्या आधारावर वेगवेगळ्या विभागातील पुरस्कार दिले जातात.

हा पुरस्कार डॉ. माल्कम जॉन्सन (डेप्युटी जनरल सेक्रेटरी, इंटरनॅशनल टेलिकॉम युनियन, जिनिव्हा) यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.  दि. 16 मे रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे कार्यक्रम झाला.  फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी हे महाविद्यालय 1996 साली फिनोलेक्स समूहाचे अध्यक्ष पी. पी. छाब्रिया यांच्या प्रेरणेतून उभे राहिले. गेल्या 22 वर्षांमध्ये या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे.

या महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आय. टी., केमिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन हे पदवी अभ्यासक्रम तसेच मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यात येते. या महाविद्यालयामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेणे सोयीचे झाले आहे. सध्या या महाविद्यालयात 1700 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून 80% हून अधिक विद्यार्थी हे कोकणातील आहेत. या यशाबद्दल अध्यक्षा अरुणा कटारा व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन केले.