Wed, Jan 22, 2020 13:24होमपेज › Konkan › पुरातन सोमेश्‍वर मंदिराला ४५० वर्षांच्या श्रद्धेचा भक्‍कम पाया!

पुरातन सोमेश्‍वर मंदिराला ४५० वर्षांच्या श्रद्धेचा भक्‍कम पाया!

Published On: Aug 19 2018 11:05PM | Last Updated: Aug 19 2018 10:36PMरत्नागिरी : राजेश चव्हाण

श्रावण सुरू झाला की, कोकणाला गणरायाच्या  आगमनाचे वेध लागतात. तत्पूर्वी श्रावणातील विविध सण भक्‍तिभावाने साजरे केले जातात. कोकणात अनेक पुरातन शिवालये प्रसिद्ध असून, श्रावणातील नामसप्‍ताह, एक्‍का आधी कार्यक्रमाने ही मंदिरे भाविकांनी गजबजून जातात. जिल्ह्यात अनेक शिवमंदिरे प्रसिद्ध आहेत. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्‍वर गावातील श्रीदेव सोमेश्‍वराचे पुरातन मंदिरही असेच वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झालेल्या या देखण्या मंदिरातील खांबांवरील कलाकुसर विशेष नजरेत भरते.

रत्नागिरी शहरापासून सुमारे 11 कि.मी.वर सोमेश्‍वर गाव काजळी नदीच्या काठावर वसले. श्रीदेव सोमेश्‍वरच्या नावावरून या गावाला सोमेश्‍वर हे नाव पडल्याचे सांगण्यात येते. आंबा, काजू तसेच नारळीच्या बागांनी नटलेले हे गाव. या गावात सर्वधर्मीय लोकांची वस्ती असून सर्व जण गुण्या-गोविंदाने रहातात. 

या  गावचे वैशिष्ट्य म्हणजे चारशे-साडेचारशे वर्षांपूर्वीचे प्रसिध्द सोमेश्‍वर मंदिर. कोकणासह महाराष्ट्रातील हे एकमेव पश्‍चिमाभिमुख शिवमंदिर आहे. मंदिराला पश्‍चिमेकडील मुख्य प्रवेशद्वारासह उत्तर-दक्षिणेलाही दोन दरवाजे आहेत. सभामंडप, मुख्य मंदिर, गाभारा व उत्तर-दक्षिणेचे सभामंडप अशा पाच टप्प्यांमध्ये या मंदिराची विभागणी झाली आहे  सर्वसाधारणपणे शंकराची मंदिरे ही पूर्वाभिमुख असतात. मात्र, श्री सोमेश्‍वराचे मंदिर याला अपवाद आहे. मंदिरात प्रवेश करतानाच सभामंडपातील नंदीची भव्य मूर्ती विशेष लक्ष वेधून घेते. या मूर्तीच्या पुढेच कासवाचे कोरीव शिल्प जमिनीवर आहे.

या मंदिराचा जीर्णोध्दार इ. स. 1687च्या दरम्यान साडेतीनशे वर्षापूर्वी आठवले नामक एका महिलेने केल्याची नोंद मंदिरातील एका खांबावर मोडी लिपीत असल्याची पहायला मिळते. भल्या-मोठ्या जांभ्या चिर्‍याच्या शिळांचा वापर मंदिर उभारणीच्या कामात करण्यात आला आहे. मंदिराच्या छताचे लाकडी नक्षीकाम विलोभनीय असे आहे. मंदिरातील जमिनीवर आता लाद्या बसविण्यात आल्या असून मंदिराच्या छताची कौले फक्‍त बदलण्यात आली आहेत. किरकोळ डागडुजी वगळता ग्रामस्थांनी पुरातन मंदिराची जपणूक  उत्तम प्रकारे केली आहे.

मंदिरातील गाभार्‍यात श्री सोमेश्‍वराची पिंडी आहे तर गाभार्‍याबाहेर गणपती  व कालभैरवाच्या मूर्ती भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतात. श्री सोमेश्‍वराची पिंडी ही त्र्यंबकेश्‍वराच्या पिंडीप्रमाणे खोलगट आकाराची आहे. महाराष्ट्रात अशी ही दोनच मंदिरे आहेत. सोमेश्‍वर मंदिराच्या आवारातच श्री भराडीन तसेच रवळनाथाचे मंदिर आहे. श्री देव सोमेश्‍वर मंदिरातील सर्व पुरातन मूर्तीवर पाच महिन्यांपूर्वी वज्रलेप करण्यात आला. श्री सोमेश्‍वर फंड, श्री सोमेश्‍वर उत्सव समिती, श्री सोमेश्‍वर ट्रस्ट व नवरात्र उत्सव मंडळ सोमेश्‍वर या चार संस्था व ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतला.

मंदिराच्या समोरच खोतांची नावे असलेल्या सहा दीपमाळा आहेत. श्री सोमेश्‍वर हे सोहनी, सोहोनी, सोवनी, सोनी, केळकर, आठवले, नानिवडेकर या कुटुंबियांचे कुलदैवत आहे. श्रावणाच्या दुसर्‍या सोमवारी मंदिरामध्ये एक्क्याचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ यात सहभागी होतात. मंदिराच्या आवारातच श्रीदेवी भराडीन व श्री रवळनाथाचे दुसरे मंदिर आहे. या  मंदिराचा जीर्णोध्दार लवकरच हाती घेतला जाणार आहे. श्री सोमेश्‍वर मंदिराच्या मागील बाजुला पाण्याचा मोठा तलाव आहे.