Tue, Jul 07, 2020 23:43होमपेज › Konkan › मुख्याधिकार्‍यांचे निलंबन न झाल्यास उपोषण

मुख्याधिकार्‍यांचे निलंबन न झाल्यास उपोषण

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 10:55PMचिपळूण : शहर वार्ताहर

नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना दिलेल्या निवेदनानुसार डॉ. पंकज पाटील हे चिपळूण न.प.त गेली अडीच वर्षे कार्यरत आहेत. यापूर्वी ते शाहदा येथे कार्यरत होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप शाबीत झाले होते. त्यानुसार कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी सादर केला होता. मात्र, शासनाकडून कारवाई होईल, या भीतीने पाटील हे दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले. त्यानंतर पुन्हा ते न.प.त हजर झाले नाहीत. 

दरम्यान, सात-आठ  महिने  गैरहजर राहिल्यानंतर संचालक, नगरविकास विभागाकडून त्यांना चिपळूण न.प.त हजर होण्याचे आदेश प्राप्‍त झाले. त्यांच्या विरोधात शासनाकडून कारवाई प्रलंबित असताना त्यांचे मूळ नाव पंकज गोकुळ पवार असे होते. मात्र, चिपळूण न.प.त हजर होताना त्यांनी स्वत:चे नाव जाणीवपूर्वक बदलले व पवार ऐवजी ‘पाटील’ असे नवीन नाव धारण केले. 

चिपळूण न.प. हजर होताच त्यांच्याकडून मनमानी कारभार सुरू झाला. शहराच्या विकासकामात अडथळे, कार्यालयीन कामकाजात न.प. अधिकारी व इतर कर्मचार्‍यांमध्ये दहशत, तसेच भेटायला गेलेल्या नागरिकांना त्यांच्याकडून उन्मत्त व उद्दामपणाची वागणूक, आर्थिक उलाढाली अशा सर्व बाबींमुळे शहरातील जनतेमध्ये पाटील यांच्याविरोधात प्रचंड संतापाची भावना वाढू लागली आहे. वारंवार होणार्‍या तक्रारी व नागरिकांचा संताप याची दखल घेऊन सभागृहाने मध्यंतरात सर्वानुमते त्यांच्याविरोधात चौकशी व  निलंबन करावे, असा ठराव मंजूर केला आहे. तसेच जिल्हाधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रारीनुसार एका समितीद्वारे जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी केली. 

या बाबतची दखल घेऊन सभागृहाने ठराव क्र. 55, 8 ऑगस्ट 2017 रोजी त्यांच्या विरोधात कारवाईबाबत सर्वानुमते ठराव केला. परंतु, नगरविकास विभागाकडून त्याकडे वेळीच लक्ष दिले गेेले नाही. या निवेदनाची दखल न घेतल्यास न. प.समोर उपोषण करण्यात येईल, असे मुकादम यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.राज्याचे नगरविकास खाते आता याबाबत काय भूमिका घेते, याकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.

URL :  allegations, financial, mismanagement, proved, konkan news