Thu, Jun 27, 2019 15:44होमपेज › Konkan › कोकणातील विमान सेवेला गती

कोकणातील विमान सेवेला गती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई /रत्नागिरी : प्रतिनिधी

केंद्रीय हवाई परिवहन, वाणिज्य व उद्योग मंत्री ना. सुरेश प्रभू हे  1 एप्रिल रोजी रविवारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग दौर्‍यावर येत असून गेली काही वर्षे रखडलेल्या रत्नागिरी तसेच  सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाची पाहणी करणार आहेत.त्यांच्या दौर्‍यादरम्यान रत्नागिरी येथे ‘राऊंड टेबल कॉन्फरन्स’ चेही आयोजन केले असून त्यामुळे कोकणाचा पर्यटन व औद्योगिक विकास व दळणवळणाचे साधन म्हणून महत्त्वाची समजली विमान सेवा लवकर मार्गी लागेल, अशी आशा कोकणी माणसाला वाटू लागली आहे. रेल्वेनंतर विमान सेवा सुरु झाली तर कोकणच्या विकासाला आणखी गती प्राप्‍त होणार आहे.

नवे खाते प्राप्‍त झाल्यानंतर ना. प्रभू हे रविवारी प्रथम रत्नागिरीत येत आहेत. येथे ते रत्नागिरी विमानतळाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर   जिल्हाधिकारी कार्यालयात कोकण विकासासंदर्भांत अधिकार्‍यांशी बैठक घेतील.  नंतर ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशन आयोजित महिला सबलीकरणाचा कार्यक्रम अंबर हॉल, रत्नागिरी येथे उपस्थित राहून तो कार्यक्रम आटोपून ते सिंधुदुर्गात हेलिकॉप्टरने जातील. त्यानंतर कुडाळ येथे मुंजाळ फाऊंडेशन आयोजित महिला सबलीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकार परिषद व त्यांनतर गेली 20 वर्षे रखडलेल्या सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाची पाहणी ते करणार आहेत. यावेळी ते अधिकार्‍यांशी चर्चा करून काही अडचणी आहेत का जाणून घेणार आहेत. हवाई मंत्री असल्याने विमानतळांचा मार्ग सोपा करतील सोडविण्याचा प्रयत्न करतील.

ना. प्रभू हे रेल्वे मंत्री असताना त्यांनी अनेक रेल्वे प्रकल्प मंजूर केले असून त्यामुळे कोकण विकासात भर पडणार आहे.ते सध्या उद्योग, वाणिज्य आणि सुदैवाने ते सध्या हवाई परिवहन मंत्री म्हणून काम पहात आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातील चिपी व रत्नागिरीतील विमानतळांच्या विकासाला चालना मिळणार आहे.रत्नागिरी विमानतळाची गेले काही वर्षे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे पर्यटन व औद्योगिकद‍ृष्ट्या विकास रखडला आहे. सिंधुदुर्गातील विमानतळाचेही काम रखडले आहे.आतापर्यंत मुहूर्ताच्या तारखा मिळाल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येत्या जूनमध्ये विमान टेक ऑफ होईल, असे आश्‍वासन दिले आहे. सिंधुदुर्गातील लोक विमानाने गणपतीला गावी जाण्याचा बेतात होते.पण या वेळच्या अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी चिपी विमातळाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उत्तर देताना विमानतळाचे उद्घाटन नेमके कधी होईल, या बाबत ठोस आश्‍वासन दिलेले नाही. त्यामुळे कोकणातील जनतेला त्याची प्रतीक्षाच करावी लागणार, असे दिसत होते. 

दरम्यान, आता ना. प्रभू यांच्याकडे नुकताच हवाई परिवहन मंत्री पदाचा कार्यभार हातात आल्याने आता रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गातील विमानतळावरुन विमानसेवा लवकर सुरू होऊन कोकणचा आणखी विकास होण्यासाठी मदत होईल, अशी आशा वाटू लागली आहे. ना. प्रभू यांचा दौरा कोकणच्या विकासाच्या द‍ृष्टीने महत्त्वाचा मानला जात  आहे.

Tags : Konkan, Konkan News, airline, work, speed, Konkan


  •