Mon, May 27, 2019 06:41होमपेज › Konkan › कृषिमालाची प्रतवारी यंत्र ठरविणार

कृषिमालाची प्रतवारी यंत्र ठरविणार

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 10:36PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शेतीमालाला योग्य दर मिळण्यासाठी आणि प्रतवारी दर्जेदार राखण्यासाठी कोकणातील बाजार समित्यांना धान्य चाळणी यंत्रे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे कोकणातील आंबा आणि काजूबरोबर अन्य उत्पादनांचीही प्रतवारी उंचावण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विभागातर्फे देण्यात आली.

कृषिमालाला योग्य व वाजवी दर मिळण्यासाठी आणि कृषिमालाची प्रतवारी दर्जेदार राखण्यासाठी कोकणातील बाजार समित्यांसाठी ग्रेन क्‍लिनिंग मशीन (जीसीएम) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही यंत्रणा येथील समित्यांमध्ये उपलब्ध नसल्याने कोकणातील शेतकर्‍यांना मुंबई अथवा अन्य विभागातील यंत्रणांवर अवलंबून राहावे लागत होतेे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून स्थानिकस्तरावरच धान्य सफाईची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्यामुळे कोकणातील कृषी उत्पादनांची प्रतवारी निश्‍चित होणार आहे. ही यंत्रे बाजार समित्याच्या आवारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे धान्यांची साफसफाई यंत्राद्वारे करण्याची सुविधा येथील समित्यांच्या आवारातच शेतकर्‍यांना उपलब्ध होणार आहे. यासाठी तीन कोटींचा निधी पाच जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आला आहेे. यामध्ये 25 टक्के खर्च  समित्यांनी स्वनिधीतून करण्यास मान्यता देण्यात आली आहे.