Mon, Jul 22, 2019 04:41होमपेज › Konkan › नाटेत होणार ‘वेद संशोधन’ प्रकल्प

नाटेत होणार ‘वेद संशोधन’ प्रकल्प

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 06 2018 11:16PMराजापूर : प्रतिनिधी

वैदिक सेवा संस्थानच्या वतीने सादर करण्यात आलेल्या वेद संशोधनावर आधारित प्रकल्पाला भारतीय शिक्षण मंडळाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. सुमारे 200 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील नाटे  येथे साकारणार आहे.

मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे दि. 28, 29 तसेच 30 एप्रिल 2018 या कालावधीत आंतरराष्ट्रीय विराट गुरुकुल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय शिक्षण मंडळ, सांस्कृतिक विभाग, मध्य प्रदेश शासन व महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान,  उज्जैन यांच्या संयुक्‍त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानच्या आवारात पार पडलेल्या या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत,  केंद्रीय मानव संसाधनमंत्री प्रकाश जावडेकर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.

या संमेलनामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील काही गुरुकुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये श्री नाटेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे, जुगाई वेदविद्या गुरुकुलाचे अध्यक्ष ह. रा. ठाकूर उपस्थित होते. त्यांनी ‘इस्रो’चे निवृत्त शास्त्रज्ञ वाय. के. दीक्षित यांनी तयार केलेला ‘वैदिक सेवा संस्थान’चा प्रकल्प अहवाल सादर केला आहे. तो भारतीय शिक्षण मंडळाने स्वीकारला आहे. या बाबतचे पुढील मार्गदर्शन भारतीय शिक्षण मंडळाकडून होणार आहे. 

देवस्थानमार्फत 15 एकर जागा

या प्रकल्पाचा अंदाजे खर्च दोनशे कोटी रुपये असून वार्षिक खर्च सुमारे पाच कोटी रुपये अपेक्षित आहे. त्यासाठी लागणारी सुमारे 10 ते 15 एकर जागा देवस्थानमार्फत करारावर देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा अहवाल करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या तसेच वाय. के. दीक्षित व नाटेश्‍वर देवस्थान अध्यक्ष यांच्याकडे उपलब्ध आहे.