Fri, Jan 24, 2020 22:02होमपेज › Konkan › मताधिक्य मिळवून न देणारे शिवसेना लोकप्रतिनिधी पदांपासून राहणार वंचित

मताधिक्य मिळवून न देणारे शिवसेना लोकप्रतिनिधी पदांपासून राहणार वंचित

Published On: May 27 2019 1:34AM | Last Updated: May 26 2019 10:14PM
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना मिळालेल्या मताधिक्याचा विचार स्थानिक पदाधिकार्‍यांकडून पूर्ण झाला आहे. ज्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात सेना उमेदवाराला मताधिक्य मिळालेले नाही त्या स्थानिक लोकप्रतिनिधींना यापुढे तुम्हाला त्या-त्या स्वराज्य संस्थांतील पदे का द्यायची? अशी विचारणा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यांना स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांनी प्रचारादरम्यान आव्हान निर्माण केले होते. रत्नागिरी तालुक्यामध्ये तर त्यांनी पूर्ण लक्ष घालून शिवसेनेच्या गोटात धडकी निर्माण केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत सर्वांनाच सावध राहण्याच्या सूचना केल्या होत्या.

तालुक्यात ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत शिवसेनेचे वर्चस्व आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध समित्यांच्या पदाधिकार्‍यांना पदे मिळतात. स्थानिक नेत्यांच्या मान्यतेनुसार ही पदे दिली जातात. परंतु, ज्या मतदारसंघातून लोकसभा निवडीवेळी सेना उमेदवाराला मताधिक्य मिळालेले नाही तेथील सेनेच्या लोकप्रतिनिधीला स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदांसाठी विचारात न घेण्याचे ठरले होते.

कोतवडे गटाने सर्वाधिक मताधिक्य दिले असून, शिरगांव जि. प. गटातून सर्वात कमी मताधिक्य मिळाले आहे. इतर आठ गटांमधून 2500 ते 3000 पर्यंतचे मताधिक्य सेनेच्या उमेदवाराला मिळाले आहे. रत्नागिरी नगर परिषद क्षेत्रातील राजिवडा, कोकणनगर भागातून सेनेच्या विनायक राऊत यांना मताधिक्य मिळालेले नाही. मिरकरवाड्यातून स्वाभिमान आणि शिवसेनेला फिफ्टी फिफ्टी मतदान झाले आहे.