Tue, Apr 23, 2019 02:15होमपेज › Konkan › ...तर पंचायत समिती हवी कशाला?

...तर पंचायत समिती हवी कशाला?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील विकासकामांबाबत पंचायत समिती प्रशासन सहकार्य करीत नाहीत, आम्हाला अंधारात ठेवले जाते, असा आक्षेप संतप्त सदस्यांनी घेतला. आमची कामे होणार नसतील तर पंचायत समिती हवी कशाला? ती  बंद ठेवा, अशी मागणी बुधवारच्या मासिक सभेत केली. सदस्यांच्या या आक्रमकतेमुळे पंचायत समिती प्रशासन विकासकामांबाबत उदासीन असल्याचे या सभेत उघड झालेे.

सभापती सुभाष गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मासिक सभेला गटविकास अधिकारी शिवाजी माने, पंचायत समिती सदस्य, विविध खात्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा पार पडली. गेल्या काही मासिक  सभांदरम्यान झालेले ठराव यावर कार्यवाहीच झालेली नसल्याने सदस्य आक्रमक झाले. त्याशिवाय शासनाकडून येणारी परिपत्रके याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना दिली जात नाही. त्यामुळे संतापात अधिकच भर पडली. जर प्रशासन आम्हाला अंधारात ठेवत असेल व सहकार्य करीत नसेल तर पंचायत समितीच बंद ठेवा, अशी संतप्त मागणी सदस्य प्रकाश गुरव यांनी केली.

या सभेत  महिला व बाल कल्याण, विद्युत विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा आदी विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये महिला व बाल कल्याण विभागांतर्गत काही  अंगणवाडी सेविकांचे रखडलेले मानधन यावर उपस्थीत सदस्यांनी मुद्दे उपस्थित केले होते. अन्य विषय देखील वादाला कारणीभूत ठरले. या विषयावरुन सभापती गुरव व सदस्य यांच्यात जुंपल्याचे पहावयास मिळाले.
तालुक्यातील वडदहसोळ या शाळेत शिक्षक उपस्थित नसल्याने  दि. 12 फेब्रुवारीला एका अंगणवाडी सेविकेने त्या शाळेत शिक्षकाचे काम पाहिल्याची धक्‍कादायक बाब सदस्य प्रतीक मठकर यांनी मागील सभेत  सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिली होती. पण त्यावर कोणताच निर्णय झाला नव्हता. त्यामुळे या सभेत  तो मुद्दा पुन्हा उपस्थित झाला. त्यावर सभापती गुरव यांनी आपण दोन दिवसांत याची बैठक घेऊन चौकशी करतो, असे सभागृहाला आश्‍वासन दिले.

शासनाच्या कमी पटसंख्येच्या धोरणाचा फटका प्राथमिक शाळांप्रमाणेच आता अंगणवाड्यांना बसू लागला आहे. ज्या अंगणवाडीतील पटसंख्या 25 पेक्षा कमी आहे. त्यांच्यावर गंडांतर येणार आहे. तालुक्यात अशा 69 अंगणवाड्या  आहेत. त्यामुळे भविष्यात त्या अंगणवाड्या बंद झाल्यास तेथील लहान मुलांना अन्यत्र हलवावे लागणार आहे. अशावेळी तेथील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने शासनाने तो निर्णय रद्द करावा, अशी मागणी करणारा सभेत  बैठकीत करण्यात आला.

गतवर्षी तालुक्याला  टँकरमुक्‍ती दाखवली गेली होती. प्रत्यक्षात काही गावे व वाड्या यांना टँकरची आवश्यकता असताना त्यांना टँकर दिला गेला नव्हता. त्यामुळे यावेळी अशी कोणती स्थिती निर्माण होऊ नये, याची दखल घेऊन प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. तालुका कृषी विभागाचे अधिकारी वाळके कधीच पं. स. च्या मासिक सभेला  उपस्थित नसतात.त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्‍त करीत तात्काळ त्यांची अन्यत्र बदली व्हावी, असा ठराव केला. याव्यतिरिक्‍त अन्य विषयांवर चर्चा मासिक सभेत करण्यात आली.

Tags : 


  •