Tue, May 21, 2019 22:59होमपेज › Konkan › रत्नागिरी शहराचा बंद असलेला सोमवारचा पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत

शीळ, पानवल धरणे ‘ओव्हर फ्लो’

Published On: Jun 19 2018 10:47PM | Last Updated: Jun 19 2018 10:02PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे शीळ आणि पानवल धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे गेल्या एप्रिल महिन्यापासून बंद असलेला दर सोमवारचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात पानवल धरणातील पाणी संपल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यात अनेक अडथळे निर्माण झाले होते.

शहराला शीळ आणि पानवल धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पानवल धरणातील पाणी संपल्यानंतर शहरात पाणीपुरवठ्याचा गोंधळ उडतो. त्यानुसार यंदाही पाण्याची टंचाई सुरू झाली होती. यावर उपाय म्हणून अंतर्गत जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी एप्रिल महिन्यापासून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल, असे रत्नागिरी नगर परिषदेकडून सांगण्यात आले. त्यानुसार दर सोमवारी पाणी पुरवठा बंद ठेवून अंतर्गत दुरुस्ती करून घेण्यात आली.

दर सोमवारचा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतरही पाणीपुरवठ्यातील अडथळे कमी होत नव्हते. रोजच्या रोज शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागातून पाणी न आल्याची समस्या घेऊन रहिवासी नगर परिषदेत येत होते. पाणीच आले नाही, आलेले पाणी कमी दाबाने होते, अशा आशयाच्या तक्रारी होत्या. परंतु, यावर ठोस उपाय निघत नव्हता. आता मात्र पावसाने या समस्येचे निवारण केले आहे.

गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसानेच दोन्ही धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. त्याचवेळी अंतर्गत जलवाहिन्यांची दुरूस्ती झाल्याने आता नळाला पाणी येत नाही ही तक्रार कमी झाली असून पावसाचे पाणी घरात घुसते, अशा तक्रारी येऊ लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या मिटल्याने पाणी विभागाच्या मागे लागलेल्या कटकटी कमी झाल्या आहेत.