Thu, Jan 30, 2020 00:24होमपेज › Konkan › चिपळूणचे महत्त्व उलगडणारा ‘मैलाचा दगड’ सापडला

चिपळूणचे महत्त्व उलगडणारा ‘मैलाचा दगड’ सापडला

Published On: Jun 22 2019 1:04AM | Last Updated: Jun 22 2019 1:04AM
चिपळूण : खास प्रतिनिधी

मराठीमध्ये एक महत्त्वाची खूण म्हणून ‘मैलाचा दगड’ असा शब्दप्रयोग केला जातो. असा एक ऐतिहासीक मैलाचा दगड चिपळुणात सापडला असून ब्रिटीशकालीन चिपळूणचे भौगोलिक महत्त्व सांगणारा हा मैलाचा दगड आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन व्हावे, अशी भूमिका येथील पुरातन ठेवा अभ्यासक मार्तंड माजलेकर यांनी व्यक्‍त केली आहे.

चिपळूण भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्याच पद्धतीने भगवान परशुरामांचे हे तीर्थस्थान आहे. येथील गडकिल्ले, पुरातन मंदिरे, शिल्पकला,  शिळा, वीरगळं या भूमीत आजही इतिहासाच्या खुणा दाखवून देतात. या विषयात पुरातन इतिहासाच्या खुणा संवर्धन करण्याचा ध्यास घेतलेल्या मार्तंड याने असाच एक मैलाचा दगड शोधून काढला आहे. 

शहरातील गांधी चौकात जमिनीत अर्धवट गाडलेला व वरूण त्रिकोणाकृती दिसणार्‍या दगडाने या युवकाचे लक्ष वेधले. या दगडाला थोडे स्वच्छ केल्यानंतर त्यावर इंग्रजीत ‘कराड 59’ अशी अक्षरे कोरलेली आढळली. मुंबई येथील चंदन विचारे हे मुंबईमध्ये सापडलेल्या ब्रिटीशकालीन मैलाच्या दगडांवर अभ्यास करीत आहेत. त्यांना या दगडाची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी या दगडाबाबत काही तर्कवितर्क लावले. ‘कराड 59 मैल’ असे या दगडावर कोरलेले आहे. ब्रिटीशकाळात अंतर मोजण्यासाठी मैल हे मापक वापरले जायचे. एक मैल म्हणजे 1.8 कि.मी. त्यामुळे गांधी चौकापासून कराडचे अंतर 106 कि.मी. होते. या अंतराबाबत गुगल मॅप आणि गुगलचा हिशोब यावरुन हा दगड मैल दाखविणारा आहे हे स्पष्ट होत आहे. चिपळूण-कराड अंतरदर्शक असा हा मैलाचा दगड आहे हे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. 

पूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात बैलगाड्या किराणा माल भरुन चिपळुणात यायच्या. हा माल बोटीतून मुंबईकडे जायचा आणि मुंबईमधून आलेले कपडे, मसाल्याचे पदार्थ, मीठ आदी माल बैलगाड्यांमध्ये भरुन पाठविला जायचा. त्यामुळे ही ऐतिहासीक अशी उतारपेठ होती. एकावेळी चिपळूण-कराड मार्गावर दोनशे बैलगाड्यांचा ताफा प्रवास करायचा. हा इतिहास आजही सांगितला जातो. लिखीत स्वरूपात त्याचे पुरावेदेखील आहेत. त्यामुळे हा दगड चिपळूण ते कराड हे अंतर दर्शविणारा आहे.  या दगडाचा भौगोलिक व ऐतिहासीक ठेवा म्हणून संवर्धन करणे गरजेचे आहे. याबाबत चिपळूण नगर परिषदेला निवेदन देण्यात आले आहे. न.प.ने त्या बाबत तयारी दर्शवली असून न.प.कडून त्यासाठी सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा मार्तंड माजलेकर याने व्यक्‍त केली आहे.