Fri, Jul 19, 2019 16:02होमपेज › Konkan › वेळ पडल्यास घरात घुसून मारु : नीलेश राणे

वेळ पडल्यास घरात घुसून मारु : नीलेश राणे

Published On: Aug 24 2018 12:44AM | Last Updated: Aug 23 2018 11:04PMरत्नागिरी : प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांतील घडामोडी पाहता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अख्खी शिवसेना कामाला लावली आहे. आमच्या नादाला लागायचे नाही अन्यथा वेळ पडल्यास घरात घुसून मारु, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

राणे म्हणाले, निवळी हातखंबा मार्गावरील धाब्यात शासकीय नियमांचे उल्‍लंघन होत असून रात्री कोणत्याही वेळी दारू उपलब्ध करून दिली जात आहे. धाब्याच्या ठिकाणी दारू कशी विकली जाते? धाबा म्हणजे परमीट रुम नाही. याबाबत बुधवारी रात्री खात्री करण्यासाठी गेलो असता रात्री 12.30 वा. तीन टेबलवर दारू प्राशन सुरू होते. लाईट बंद करून येथे गुपचूपपणे दारुविक्री केली जाते. याची लेखी तक्रार ग्रामीण पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे. या धाब्यावर रात्री बेरात्री दारू पिऊन वाहन चालवल्याने अनेकांचे अपघात झाले आहेत.  या अनधिकृत दारू विक्रेत्यासाठी सेनेचे लोकप्रतिनिधी एकत्र आले असल्याचा आरोप राणे यांनी केला. तेवढीच बाजू कोकणातील प्रश्‍न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घेतली असती तर आज महामार्गाचा प्रश्‍न सुटला असता. नाणारचा रिफायनरी प्रकल्प रद्द झाला असता. कोकणात इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रश्‍न निकाली निघाला असता, रेल्वेचे दुपदरीकरण ही कामे रखडली आहेत. 

खासदारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे दबाव टाकतात, असे म्हटले आहे. हॉस्पिटलला जाऊन कार्यकर्त्याच्या तब्येतीची चौकशी करणे, पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करणे यात कुठे दबाव येतो. माझ्याकडे कोणतेही शासकीय पद नाही मग मी दबाव कसा आणू शकेन? असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, मंगेश शिंदे, परिमल भोसले, सचिन आचरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी  राणे यांनी पोलिस अधीक्षक मुंढे यांची भेट घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली.