Fri, Jan 24, 2020 21:42होमपेज › Konkan › कुडाळचा घनकचरा प्रकल्पाचा तिढा जैसे थे

कुडाळचा घनकचरा प्रकल्पाचा तिढा जैसे थे

Published On: Jun 25 2019 1:34AM | Last Updated: Jun 24 2019 10:59PM
कुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ नगरपंचायतीचा घनकचरा प्रकल्प यशस्वी चर्चेतून मार्गी लागावा याकरिता शनिवारी ठरल्यानुसार सोमवारी कुडाळ एमआयडीसी येथे नियोजित बैठक पार पडली. मात्र, या बैठकीकडे नेरूर ग्रामस्थ व पिंगुळी शेतकरी समितीच्या प्रमुख मंडळींनी पाठ फिरविल्याने घनकचरा प्रकल्पाचा तिढा जैसे थे राहिला.  दरम्यान, आ. वैभव नाईक यांनी आपण याप्रश्‍नी तोडगा काढू, अशी ग्वाही दिली. दुसरीकडे एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारपर्यंत थांबा, अशी विनंती केल्याने   नगरसेवकांसह कुडाळ स्मार्ट फोरमने तूर्त ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली. शुक्रवारपर्यंत याप्रश्‍नी यशस्वी तोडगा न निघाल्यास शनिवारी एमआयडीसीसमोर तीव्र उपोषणाचा इशारा एमआयडीसी प्रशासनाला नगरपंचायत व कुडाळ फोरमने दिला. याप्रश्‍नी आता एमआयडीसी प्रशासन काय भूमिका घेते याकडे कुडाळवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. 

कुडाळ नगरपंचायीच्या एमआयडीसी येथील घनकचरा प्रकल्पाला नेरूर व पिंगुळी शेतकरी समितीने विरोध दर्शविल्याने एमआयडीसीने या प्रकल्पाला स्थगिती दिली. याप्रश्‍नी कुडाळ स्मार्ट फोरमने पुढाकार घेत यशस्वी मध्यस्थी करण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. शनिवारी झालेल्या घनकचरा प्रकल्प सादरीकरण व चर्चासत्र कार्यक्रमानंतर सोमवारी कुडाळ एमआयडीसी येथे नियोजित बैठकीकडे नेरूर ग्रामस्थ व पिंगुळी शेतकरी समितीच्या प्रमुख मंडळींनी पाठ फिरविली. फोरमचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर यांना उद्योगमंत्र्यासोबतची पालकमंत्र्यांनी ठरविलेली बैठक होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही बैठकीला उपस्थित राहत नसल्याचे नेरूर ग्रामस्थांनी रविवारी सायंकाळी सांगितले. परिणामी सोमवारची बैठक नेरूर व पिंगुळी ग्रामस्थांच्या अनुपस्थितीत कुडाळ फोरम, कुडाळ नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या उपस्थितीत  एमआयडीसी रेस्ट हाऊसवर झाली. 

कोणत्याही परिस्थितीत घनकचरा प्रकल्प झालाच पाहिजे. आतापर्यंत हा विषय नगरपंचायतचा होता, पण तो आता सर्व कुडाळवासीयांचा झाला आहे, असे राजन बोभाटे यांनी सांगितले. या प्रकल्पाकरिता एमआयडीसीने प्लॉट दिला, त्यामुळे त्यांनीच या वादावर तोडगा काढावा, अशी मागणी गजानन कांदळगांवकर यांनी केली. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांनी जर घनकचरा प्रकल्पाला स्थगिती दिली असेल तर  त्यांनीच उठवावी, न पेक्षा दबाव गट तयार करावा लागेल असे नगरसेवक एजाज नाईक यांनी सांगितले. स्थानिक आ. वैभव नाईक यांनी प्लॉट बदलून देण्याची ग्वाही दिली आहे. मात्र याबाबतचे पत्र त्यांना देण्यात आले नाही, याकडे सेनेचे गटनेते बाळा वेंगुर्लेकर यांनी लक्ष वेधले. यावेळी गजानन कांदळगावंकर म्हणाले, वेंगुर्लेकर तुम्ही आमदारांशी बोला, आम्ही याप्रश्‍नी मुंबईला पण जावू असे सांगितले. या बैठकीतूनच नगरसेविका सौ. मेघा सुकी यांनी आ. वैभव नाईक यांना फोन लावला व या वादाबाबत माहिती दिली. त्यानंतर अ‍ॅड. बिले यांनी आ. नाईक यांच्याशी संवाद साधला असता स्थानिक आमदार म्हणून मी आपल्या पाठिशी आहे. प्लॉट कुठचा बदलून हवा तो सांगा, तो प्लॉट बदलून दिला जाईल, असे आ. नाईक यांनी सांगितले. दुसरीकडे रत्नागिरी येथील एमआयडीसीचे अधिकारी हरी वेंगुर्लेकर यांच्याशी राजन बोभाटे यांनी मोबाईलवर संवाद साधला असता त्यांनीही शुक्रवारपर्यंत थांबा, वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, अशी विनंती केली. प्लॉट बदलून देण्याबाबतही वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे उपअभियंता श्री. रेवंडकर यांनी सांगितले. अखेर  नगराध्यक्ष, नगरसेवक व स्मार्ट फोरमने शुक्रवारपर्यंत‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. अन्यथा शनिवारी एमआयडीसी समोर नगरपंचायत, कुडाळ फोरम व कुडामधील सर्व 12 संस्था उपोषणाकरिता बसणार असल्याचा इशारा दिला. 

एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर, विनायक राणे, सुनिल बांदेकर, सचिन काळप, प्रज्ञा राणे, सायली मांजरेकर, अश्‍विनी गावडे, संध्या तेरसे, राकेश कांदे, प्रमोद भोगटे, केदार सामंत आदी उपस्थित होते. 

    कुडाळ न. पं. व फोरमचे ‘वेट अँड वॉच’
    आ. वैभव नाईकांकडून तोडगा काढण्याची ग्वाही
    एमआयडीसी प्रशासनाकडून शुक्रवारची मुदत
    अन्यथा शनिवारी तीव्र उपोषणाचा निर्णय
    ...तर कुडाळ नं.प.समवेत शनिवारी कुडाळ फोरमही उपोषणासाठी सज्ज