Thu, Dec 12, 2019 08:09होमपेज › Konkan › जिल्हा विकासासाठी हवी ‘केरळ-तामिळनाडू पॅटर्न’ची जोड

जिल्हा विकासासाठी हवी ‘केरळ-तामिळनाडू पॅटर्न’ची जोड

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 01 2017 10:54PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रमोद म्हाडगूत

पर्यटकांचे नंदनवन म्हणून  केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील दोन राज्यांची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. या राज्यांनी कॉयर (काथ्या) उद्योग व काजूवर आधारित उद्योग तसेच बोटिंगसारख्या उद्योगातून कशाप्रकारे  आर्थिक विकास  साधला? हे चांदा ते बांदा योजनेतंर्गत कॉयर बोर्डाच्या वतीने काढण्यात आलेल्या अभ्यास दौर्‍याच्या दरम्यान प्रकर्षाने दिसून आले. केरळ-तामिळनाडूमधील परिसर, वातावरण आलेल्या प्रत्येकालाच  मोहीत करणारे आहे. विशेष म्हणजे केरळ-तामिळनाडू प्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थिती आहे. परिणामी काथ्या, काजू, बोटिंग आदी सर्व उद्योग विकसित  होण्यास  सिंधुदुर्गात अधिक वाव आहे. त्यासाठी गरज आहे ती ‘केरळ-तामिळनाडू पॅटर्न’ ची!

पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे देशात दुसर्‍या  क्रमांकाचे  राज्य आहे. तसेच सर्व क्षेत्रात प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेसाठीही हे राज्य  प्रसिध्द असून शंभर टक्के भारतातील पहिले साक्षर राज्य आहे. काथ्या सारख्या उद्योगात केरळने भरारी घेतली,टाकावू  पासून टिकावू वस्तू तयार करून जवळपास  प्रतिवर्षी 3 हजार कोटी रुपयाची उलाढाल  हे राज्य करते.  केरळच्या काथ्याप्रमाणे सिंधुदुर्गातील काथ्यालाही मोठी मागणी आहे.

किंबहुना  सिंधुदुर्गातील  काथ्या ‘गोल्डन काथ्या’ म्हणून  केरळात ओळखला जातो. विशेष  म्हणजे सिंधुदुर्गात कुडाळ येथे काथ्या उद्योगाचे महत्वाचे केंद्र असून 360 महिलांना प्रशिक्षण दिले असून कच्चा मालही मोठ्या प्रमाणात  असल्याने त्यादृष्टीने  प्रयत्न होणे  गरजेचे आहे. काजू उत्पादन व निर्यातीतही  केरळ तामिळनाडूचा अग्रक्रम लागतो. केरळमध्ये  काजू बोर्ड आहे पण सिंधुदुर्गात काजूची मोठी लागवड व चांगले पिक येते. काजूवरील उद्योगाच्या विकासासाठी सिंधुदुर्गात काजू बोर्डाचे उपप्रादेशिक केंद्र  होणे आवश्यक आहेे.  मसालेजन्य पदार्थांसाठीही सिंधुदुर्गात पोषक वातावरण  आहे. 

कृषी  विद्यापीठेही सिंधुदुर्गातील   भौगोलिक वातावरण  काजू, मसाले पिकासाठी पोषण आहे असे जाहीर करते पण  त्याठिकाणी बोर्डाचे केंद्र नाही. केंद्र झाले असते तर खर्‍या अर्थाने विकासाला अधिक गती मिळाली असती. त्यासाठी केंद्र स्तरावरून  खा. विनायक राऊत यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

बोटींग उद्योगातही केरळ, तामिळनाडु राज्यांनी मोठे अर्थाजन केले आहे. केरळमध्ये तर बॅक वॉटरमध्ये बोटिंग व्यवसाय करून  पर्यटकांना चांगली सेवा देतात त्याचप्रकारची सेवा तामिळनाडूमध्ये पर्यटकांना दिली जाते. सिंधुदुर्गातील स्वच्छ समुद्र किनारे, सह्याद्रीत विसावलेले गड, सिंधुदुर्ग जलदुर्ग, सावंतवाडीचा राजवाडा आदी अनेक ठिकाणांना  संधी आहे पण संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी आपली मानसिकता बदलून  जिल्ह्याच्या सर्वांगीण  विकासासाठी आपली एकी दाखविली तरच  राज्यातील पहिल्या पर्यटन सिंधुदुर्ग  जिल्हा पर्यटनाभिमुख विकसित होईल.