Sun, Jun 16, 2019 02:49होमपेज › Konkan › पहिल्या टप्प्यात करणार गावांतील नद्यांचे पुनरुज्जीवन: जलक्रांतीबरोबरच शाश्‍वत शेती विकासासाठी प्रयत्न

ग्रामोद्धार घडविणार्‍या ‘हरित सिंधू’ अभियानास प्रारंभ

Published On: Jun 04 2018 1:05AM | Last Updated: Jun 03 2018 8:48PMकणकवली : वार्ताहर

‘एकत्र येवूया, परिवर्तन घडवूया’ अशी साद घालत कणकवली, कुडाळ तालुक्यातील 20 गावांमधील मुंबईस्थित ग्रामस्थांनी एकत्र येत ‘हरित सिंधु’ अभियानास प्रारंभ केला आहे. अभियानांतर्गत ग्रामोद्धाराच्या संकल्पना, उपक्रम, योजना, शेतीतील नव्या प्रयोगांबाबतची माहिती लवकरच गावागावात पोहोचविली जाणार आहे. 

मुंबईस्थित ग्रामस्थांनी हरितसिंधू अभियान राबविण्याचा संकल्प केला असून दादर येथे शनिवारी झालेल्या बैठकीत त्याचे नियोजन करण्यात आले. कणकवली तालुक्यातील नरडवे, दिगवळे, नाटळ, कुंभवडे, भिरवंडे, सांगवे, हरकुळ खुर्द, हरकुळ बुद्रुक, डामरे, नागवे, करंजे, फोंडा, दारिस्ते, शिवडाव, हळवल, कोंडये व कुडाळ तालुक्यातील सोनवडे, घोडगे, जांभवडे, कुपवडे या गावांचा हरितसिंधू अभियानात सहभाग करण्यात येणार आहे. ग्लोबल ग्रुपचे अध्यक्ष चंद्रकांत सदडेकर यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथे झालेल्या शुभारंभ कार्यक्रमावेळी अभियानाचे प्रवर्तक बी डी सावंत,सिंधुदुर्ग जि प चे माजी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर,जे.वाय.सावंत, दीपक म्हसकर, के. डी. सावंत, मुकुंद सावंत, विजय मोर्ये, प्रमोद सावंत,ए. के.  सावंत, रघुनाथ चव्हाण, जी. डी. सावंत, गणेश रावराणे, आदींसह देवगड, मालवण गोळवन, तळगाव तसेच रत्नागिरी येथील ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते. 

हरितसिंधु अभियानाच्या शुभारंभाला मिळालेला प्रतिसाद पाहता गावांचे चित्र नक्की बदलेल, असा विश्‍वास वाटातो. समूह शेती संकल्पना प्रत्यक्षात यायलाच हवी. कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले की गाव विकसित होतेच. उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्री ही विकासाची बलस्थाने व्हावीत, असे विचार माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी व्यक्त केले.

बी. डी. सावंत म्हणाले, कोणी दुसरं आपल्यासाठी विकासगंगा आणेल याची वाट न पाहता स्वक्षमतेतून ग्रामविकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या 20 गावांच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी अभियानाची संकल्पना स्पष्ट केली. हरितसिंधु अभियान नोंदणीकृत केले जाईल. लोकसहभागातून निधी गोळा करून अभियानातून कायम स्वरूपात यंत्रणा विकत घेऊन पहिल्या टप्प्यात नद्यांमधील गाळ काढणे, जलस्तर वाढविण्यासाठी प्रयत्न व नंतर शाश्‍वत शेतीतून विकास, अशी या हरित सिंधु अभियानाची संकल्पना आहे. 

हरितसिंधु अभियान लवकरच गावागावात पोहचवून त्याची चळवळ व्हावी, यासाठी आमचे सर्व सहकार्य असेल, अशी ग्वाही सहभागी गावांतर्फे दीपक म्हसकर,संदीप सावंत,प्रमोद सावंत,सुहास सावंत, विजय मोर्ये,प्रमोद कृपाल, जे. वाय. सावंत, शामसुंदर चव्हाण, आकाश तावडे, मुकुंद सावंत आदींनी दिली.  कणकवली- नाटळ येथे नदी पुनरुज्जीवन अभियानातंर्गत 11 किमी नदीचे पात्र खोल करण्यात आले. यात मोठा लोकसहभाग होता. आर्थिक आणि श्रमदान अश्या दोन्ही पातळीवर  ग्रामस्थांनी आदर्शवत काम केलं आहे. या बाबतीत के. डी. सावंत यांनी माहिती दिली. हरितसिंधु अभियानामागे हीच प्रेरणा असून पहिल्या टप्प्यात सहभागी गावांमधील नद्या पुनर्जीवित करणे हे उद्दिष्ट आहे.

अभियानांतर्गत विविध उपक्रम

नद्यांचे पुनर्जीवन, जलसंधारण, सिंचन व पाण्याचे व्यवस्थापन, कृषी उत्पादन, मत्स्य संवर्धन, कृषी मालावर प्रक्रिया,पीक पद्धती विकास, पशुपालन, दुग्धोत्पादन, कृषी माल विक्री व्यवस्था, कृषी माहिती तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, जैविक विविधतेचे संरक्षण, नैसर्गिक व सेंद्रिय शेती,पर्यावरण, कृषी क्षेत्रातील संघटन, मृद संधारण, अशा मुद्यांवर अभियानांतर्गत उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात लोकसहभाग आवश्यक असून यासाठी जनजागृती केली जाणार आहे.