Thu, Apr 25, 2019 17:33होमपेज › Konkan › ‘गोकुळ’ विरोधी आंदोलन आता ९ जुलै रोजी : सतीश सावंत

‘गोकुळ’ विरोधी आंदोलन आता ९ जुलै रोजी : सतीश सावंत

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 10:06PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग  जिल्ह्यात गोकुळकडून 2013 पासून सुरू असलेले गायीचे दूध संकलन अचानक बंद केल्याने कर्जदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. गोकुळने बंद केलेले गायीचे दूध संकलन पुन्हा सुरू करावे. येथील दुग्ध व्यवसायायीक शेतकर्‍यांवर होणारा अन्याय दूर व्हावा, गोवा राज्याप्रमाणे दुधाला दर व अनुदान मिळावे, दूध उत्पादकांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 27 जून रोजी आयोजित करण्यात आलेले आंदोलन वटपौर्णिमा असल्याने हे आंदोलन 27 ऐवजी आता अधिवेशन काळात 9 जुलै रोजी करण्यात येणार आहे. सकाळी 10 वा. ओरोस येथील श्री देव रवळनाथाला दुधाचा अभिषेक करून उर्वरित दुधाचे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा रुग्णालय येथे दूध वाटप आंदोलन छेडून राज्य सरकारचे लक्ष वेधले जाणार असल्याची  माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी  पत्रकार परिषदेत दिली. 

कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाच्या असहकार्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे पाच हजार लिटर गायीचे दूध वाया जात असून दररोज हजारो रूपयांचे नुकसान होत आहे. गायीचे दूध उचल करण्यास गोकुळ दूध संघाने  नकार दिला असून दूध उत्पादक शेतकरी आणि दुग्ध विकास संस्था अडचणीत आल्या आहेत. याबाबत आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी आयोजित दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांची बैठक जिल्हा बँकेत झाली. यावेळी जि.प. उपाध्यक्ष रणजीत देसाई, एम. के. गावडे, प्रसाद देवधर, माजी आ. पुष्पसेन सावंत, मनीष दळवी आदी शेकडोच्या संखेने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सतीश सावंत बोलत होते. 

सतीश सावंत म्हणाले, गोकुळ दूध उत्पादक संघाने कोल्हापूर जिल्हा वगळता सिंधुदुर्ग व लगतच्या जिल्ह्यांमधील गायीचे दूध संकलन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गायीचे दूध उत्पादन करणारे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गायीचे प्रतिलिटर दूध 26 रूपयांनी घेतले जात असताना येथील शेतकर्‍यांनी मात्र 22 रूपये प्रमाणे दूध घालून आपली सहनशीलता दाखवली होती. मात्र अचानक दूध घेणे बंद केल्याने येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. खाद्याच्या दराचा विचार करता दूध उत्पादन करणे अत्यंत अवघड बनले आहे. याबाबत शासनही उदासीन असल्याचे दिसत आहे.

गोवा राज्यात गायीच्या दुधासाठी चांगला दर दिला जात आहे.फॅटप्रमाणे प्रतिलिटर 28 रुपये याप्रमाणे दूध विकत घेतले जात आहे.  सबसिडी दिली आहे. याचा सोयी सुविधा राज्य सरकारने येथील शेतकरी व दूध उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना द्याव्यात. राज्यातील आणि केंद्रातील सरकार गायीबद्दल संवेदनशील आहे. त्यामुळे हे सरकार येथील शेतकर्‍यांना न्याय मिळवून देईल. मात्र सरकारला जाग आणण्यासाठी 27 रोजी आंदोलन  छेडण्यात येणार होते. मात्र 27 जून रोजी वटपौर्णिमा असल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आता हे आंदोलन अधिवेशन काळात 9 जुलै रोजी छेडण्यात येणार आहे. हे आंदोलन निःपक्ष असून यात सर्व पक्षातील नेते, कार्यकर्ते, शेतकरी, दूध उत्पादक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे. 

त्यांनी एक गाय तरी पाळून दाखवावी 

ज्यांना ‘दूध’ या विषयात काही माहीत नाही, त्यांच्या टीकेला उत्तर देण्यास आपण बंधील  नाही. काही न करता केवळ टीका करत राहणार्‍यांनी पहिल्यांदा एक तरी गाय सांभाळून दाखवावी आणि मगच दुसर्‍यांवर टीका करावी. जिल्हा बँकेने कोणालाही फसवले नाही. गोकुळच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले, त्यामुळेच जिल्ह्यातील दूध उत्पादन 7 हजार वरून 25 हजार लीटरवर पोहोचले आहे. गोकुळ गायींचे दूध खरेदी करत नाही याला केवळ गोकुळच जबाबदार नाही तर शासनाचे दूधविषयक धोरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दुधाच्या  किंमत  कारणीभूत आहे. टीका करणार्‍यांनी या गोष्टी समजून घ्याव्यात, नंतरच टीका करावी, अशी खरमरीत प्रतिक्रिया सतीशसावंत यांनी मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर याच्या टीकेवर दिली.