Wed, Nov 21, 2018 19:57होमपेज › Konkan › वादळ वार्‍यामुळे मच्छी रिपोर्ट घटला

वादळ वार्‍यामुळे मच्छी रिपोर्ट घटला

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 03 2018 10:27PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

मासेमारी व्यवसायाचे शुक्लकाष्ट कमी होण्याचे नाव घेत नाही. पर्ससीन नेट मासेमारी सुरू होऊन तीन दिवसच झाले आहेत. या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मच्छी मिळण्याचा रिपोर्ट फारच कमी आहे. 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या गिलनेट, ट्रॉलिंग मासेमारीचीही तीच अवस्था आहे. समुद्रातील वादळसदृश वातावरण निवळले नसल्याने मच्छीमारांसमोर नुकसानीची समस्या उभी राहिली आहे.

गिलनेट, ट्रॉलिंग मासेमारी सुरू होऊन एक महिना होऊन गेला. पावसाळ्यातील वादळसदृश परिस्थिती मासेमारी सुरू झाल्यानंतरही कायम राहिल्याने मच्छीमार नौकांना अपेक्षित मच्छी मिळालीच नाही. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून पर्ससीननेट मासेमारी सुरू झाली. या मच्छीमार बोटींसमोरही तीच समस्या आहे. मासे मिळत नसताना बोटी दुर्घटनाग्रस्त होण्याचे प्रमाण मात्र वाढले आहे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या निरीक्षणानुसार यंदा पंधरा ते वीस टक्केच मासेमारी झाली आहे.

पर्ससीननेट नौकांना चांगला मच्छी रिपोर्ट मिळण्याची आशा होती. मात्र, गेल्या तीन दिवसांत सहा ते सात टब इतकेच मासे मिळाले असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. यातून मासेमारीसाठी होणारा रोजचा खर्चही वसूल होत नसल्याचे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून मच्छीमारांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्या कमी होण्याचे नावच घेत नसल्याने हा व्यवसायच कोलमडण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे अर्थकारण प्रामुख्याने मच्छी व्यवसायावरच अवलंबून आहे. दोन वर्षांपूर्वी पर्ससीननेट नौकांचा मासेमारीचा कालावधी कमी होऊन तो अवघ्या चार महिन्यांवर आला. मिनी पर्ससीन नौकांच्या मासेमारी परवान्याचा प्रश्‍न न्यायालयात प्रलंबित आहे. 

सर्व प्रकारच्या मच्छीमार बोटी मिळून त्या एकूण 2800 इतक्या असून मासेमारीतील बदलणार्‍या नियमांमुळे त्यांच्यातील एकी संपुष्टात येऊ लागली आहे. यातून परस्परांविरूद्ध होणार्‍या तक्रारींमुळेसुद्धा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अशा एक ना अनेक शुक्लकाष्टांमुळे मच्छीमार बांधव चिंतेने ग्रासले आहेत.

स्थानिक मच्छीमार कारवाईतही भरडतोय...

येथील समुद्रात मिळणार्‍या मासळीला चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्याबाहेरच्या मच्छीमार बोटी जिल्ह्याच्या समुद्रात मासेमारीसाठी येतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मात्र, त्याचवेळी स्थानिक मच्छीमार बोटींमध्ये किरकोळ नियमभंग दिसला तरी कारवाई होते. या कारवाईमुळेच दंड भरावा लागतो. त्याचबरोबर मासेमारीचा परवानाही रद्द होण्याची टांगती तलवार असते. अशा चारही बाजूंनी स्थानिक मच्छीमार भरडला जात आहे.