Tue, Mar 19, 2019 11:20होमपेज › Konkan › कोकणात शिवसेनेपाठोपाठ भाजपही प्रभावी

कोकणात शिवसेनेपाठोपाठ भाजपही प्रभावी

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 06 2018 11:12PMमुंबई : राजेश नाईक

कोकणवासीयांनी आतापर्यंत उभारलेल्या प्रत्येक आंदोलनात शिवसेनेने साथ दिली आहे. म्हणूनच गेल्या 25 वर्षांमध्ये हा पक्ष कोकणात तळागाळात रूजला. नजीकच्या काळातील हे चित्र तसेच राहील, असे संकेत दै. पुढारीने घेतलेल्या राज्यव्यापी महासर्वेक्षणात मिळाले. आता निवडणुका झाल्याच तर सर्वाधिक मते सेनेलाच मिळतील. मात्र त्याचबरोबर  भाजपनेही कोकणवर आपली मांड पुन्हा पक्की करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु केल्याचे चित्र आहे.  

30 टक्के कोकणवासीयांचा कौल सेनेला मिळाला. त्यापाठोपाठ 28 टक्के नागरिकांनी भाजपसोबत जाण्यास पसंती दिली. 11 टक्के जनतेची मते मिळवून काँग्रेस तिसर्‍या क्रमांकावर तर आतापर्यंत दुसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या राष्ट्रवादीचा जनाधार कमी झाल्याचे जाणवले. या पक्षाला केवळ 7 टक्के मतदारांनीच जवळ केल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले. 

कोकणात सध्याच्या घडीला भाजपचा एकही आमदार नाही. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये भाजपचा टक्‍का जेमतेमच आहे. पण राज्यात आणि केंद्रात असलेल्या भाजपप्रणित सरकारमुळे कोकणात भाजपला काही प्रमाणात अच्छे दिन आल्याचे जाणवले. सेनेपाठोपाठ भाजपला कोकणवासीयांनी कौल दिला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या 2 वर्षांमध्ये प्रचंड गतीने सुरू झाले. त्याचा कदाचित हा प्रभाव असावा. त्याचबरोबर कोकणचे सुपुत्र आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू कोकणच्या विकासाबाबत जागरूक आहेत. विविध योजनांद्वारे कोकणचा विकास व्हावा, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. भाजपचा टक्‍का वाढण्यात हा घटक कारणीभूत ठरला असावा.  
आतापर्यंत सेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला कोकणातील मतदारांनी झुकते माप दिले होते. आता तशी परिस्थिती राहिली नाही, असे चित्र सर्वेक्षणातून पुढे आले आहे. काँग्रेस आघाडीची सत्ता असताना राष्ट्रवादीला कोकणात दुसर्‍या क्रमांकाचे स्थान होते. या सर्वेक्षणात हा पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेल्याचे चित्र आहे. आश्‍चर्य म्हणजे कोकणात काँग्रेस सतत क्षीण होत चालली असली तरी या पाहणीमध्ये कोकणवासीयांनी काँग्रेसला तिसरा क्रमांक दिला आहे. 

राज्यभरातील नागरिक भाजप सरकारवर जसे नाराज दिसतात तसे चित्र कोकणातही आहे. सरकारची कामगिरी असमाधानकारक असल्याचे मत बहुतांशी लोकांनी नोंदवले. मात्र असे मत नोंदवत असतानाच देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षाही कोकणवासीयांनी व्यक्‍त केली आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे यांनाही लोकांनी दुसर्‍या क्रमांकाची पसंती दर्शवली आहे. राज्यातील जनतेने फडणवीस यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदासाठी आपले मत दिले आहे. पण कोकणात ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. तिसर्‍या क्रमांकावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. अलीकडे राज ठाकरे यांच्या झालेल्या जाहीर सभांचा हा प्रभाव असावा.

कोकणातील सर्वेक्षणादरम्यान सरकारच्या शेतकरी कर्जमाफी आणि जलयुक्‍त शिवार या निर्णयाचे लोकांनी स्वागत केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा कोकणातील शेतकर्‍यांना अत्यल्प लाभ मिळाला आणि जलयुक्‍त शिवाराचा आणि कोकणाचा तसा फारसा संबंधच आलेला नाही. 

कोकणवासीयांना बेरोजगारीचा मुद्दा सर्वाधिक डाचतो आहे, असे आढळून आले. या प्रश्‍नावर सरकार अपयशी ठरल्याचे मत लोकांनी नोंदवले. शेतकरी आत्महत्या आणि कोकणाचा काडीमात्रही संबंध नसताना या विषयावर सरकार कमी पडल्याचे मत नोंदवून कोकणातील जनतेने आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यात सरकारला म्हणावे तसे यश आलेले नाही. त्यावर बहुतांशी कोकणवासीयांनी आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. कायदा आणि सुव्यवस्थेविषयी कोकणात तशी जागरूकता असते. या सर्वेक्षणावेळी त्याचे प्रत्यंतर आले.

सरकार या मुद्द्यावर अपयशी ठरल्याचे मत नोंदवण्यात आले.  आगामी निवडणुकांमध्ये कोणता मुद्दा प्रभावी ठरेल, असा प्रश्‍न या सर्वेक्षणादरम्यान विचारण्यात आला होता. त्यात सर्वाधिक कोकणवासीयांनी जीएसटीच्या निर्णयाकडे बोट दाखवले आहे. म्हणजेेच छोट्या-मोठ्या उद्योजकांना जीएसटीच्या निर्णयाचा त्रास झालेला दिसतो. त्यापाठोपाठ मराठा मोर्चाचा प्रभाव आगामी निवडणुकांवर जाणवेल, असे मत लोकांनी व्यक्‍त केले आहे. कोकणात जातीय सलोखा बर्‍यापैकी आहे. तरीही भीमा-कोरेगाव येथील दंगलीचा मुद्दा कोकणवासीयांना महत्त्वाचा वाटतो. या मुद्द्याचा प्रभाव पडेल, असेही लोकांना वाटते. तर शेतकरी आत्महत्येचा मोठा परिणाम निवडणुकीवर जाणवेल, असे मत अनेक लोकांनी व्यक्‍त केले. 

आमचा जनाधार वाढला

कोकणात भाजपचा जनाधार आधीपासून आहेच. आता त्यात वाढ होताना दिसते. गेल्या खेपेस ज्या मतदारसंघात आम्हाला अपयश आले होते, तेथे यावेळी आम्ही नक्कीच विजयी होऊ. कोकणवासीयांच्या हितासाठी सेना कटिबद्ध असल्याने आमचा पाठिंबा सतत वाढतोय.  -उदय सामंत, शिवसेना उपनेते, आमदार

स्थानिक नेत्यांना बळ द्यावे

कोकणात भाजपची ताकद वाढत आहे. स्थानिक नेत्यांना पक्षाने बळ दिले तर भाजप कोकणात प्रथम क्रमांकाचा पक्ष बनेल. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून कोकणवासीयांनी पसंती दिली आहे, याचाच अर्थ भाजपच्या विचारसरणीवर लोकांचा विश्‍वास आहे.  - प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग