Tue, Jul 16, 2019 10:10होमपेज › Konkan › भिकेकोनाळच्या सुपुत्रामुळे वाचले हजारो प्रवाशांचे प्राण

भिकेकोनाळच्या सुपुत्रामुळे वाचले हजारो प्रवाशांचे प्राण

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 05 2018 9:03PMदोडामार्ग  ः प्रतिनिधी

अंधेरी- विर्लेपार्ले पादचारी पुलाचा भाग मंगळवारी कोसळला. यावेळी तेथून जाणार्‍या लोकल चालकाने  काही सेकंदाचा फरक असताना तात्काळ इमर्जन्सी बे्रक लावून लोकली थांबविली व शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविले. असे प्रसंगावधान दाखविणारे मोटरमन चंद्रशेखर सावंत हे  दोडामार्ग तालुक्यातील भिकेकोनाळ गावचे सुपुत्र आहेत.

याबाबत बोलताना श्री. सावंत म्हणाले, मंगळवारी मुंबईत पावसाचा जोर  होता. आपण चर्चगेट ते विरार मार्गावर लोकल घेऊन तीशी 50 कि.मी. च्या वेगाने अंधेरीच्या दिशेने निघालो होतो. लोकल विर्लेपार्ले स्थानका जवळ जात असताना तेेथील पादचारी पुलाचा काही कोसळताना आपण पाहिला. पूल ट्रॅकवरच कोसळत असल्याने क्षणाचाही विलंब न लावता इमर्जन्सी ब्रेक लावला आणि गाडी थांबवली. श्री. सावंत यांच्या या प्रसंगावधानामुळे एक भीषण दुर्घटना टळली. त्याच बरोबर हजारो प्रवाशांचे प्राण  वाचले.

2011 मध्ये मुंबईकर दहशतवादी हल्‍ला झाला होता. त्यावेळी दोडामार्ग तालुक्यातील केर-भेकुर्ली येथील विष्णू झेंडे यांनी  छत्रपती शिवाजी टर्मिनसवर लाऊडस्पिकर अनाऊसिंग करून उपस्थित प्रवाशांना दुसर्‍या मार्गाने बाहेर पडण्याची सूचना केली होती. म्हणून अनेक जण सुरक्षितरित्या बाहेर पडले होते. श्री.सावंत यांच्या प्रसंगावधानाने झेंडे यांच्या कार्यांची आठवण झाली. कार्यामुळे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. श्री.सावंत हे पहिल्यांदा भारतीय सैन्य दलाल कार्यरत होते, त्यानंतर त्यांनी पश्‍चिम रेल्वेमध्ये मोटारमन म्हणून सेवा बजावत आहेत. आपल्या हातातून हजारोंचे प्राण वाचवलेत, यापेक्षा पुण्याचे काम काय आहे. आपले जीवन खर्‍या अर्थाने सार्थकी लागल्याचे ते म्हणाले.

दोडामार्ग सरपंच सेवा संघ करणार सत्कार

अंधेरी(मुंबई) येथे रेल्वे ट्रॅकवर पूल कोसळत असताना मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी प्रसंगावधान राखत लोकलचा इमर्जन्सी ब्रेक मारून शेकडोंचे प्राण वाचविल्याने दोडामार्ग तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे दोडामार्ग तालुक्याचे नाव उंचावल्याने सरपंच सेवा संघाच्यावतीने यांचा  जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तर शिवसेनेच्यावतीनेही त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रमुख बाबुराव धुरी व उपजिल्हा संघटक गोपाळ गवस यांनी दिली.