होमपेज › Konkan › एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या कार्यक्रम व्यवस्थापकास लाच घेताना रंगेहाथ पकडले

एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या कार्यक्रम व्यवस्थापकास लाच घेताना रंगेहाथ पकडले

Published On: May 10 2018 1:36AM | Last Updated: May 09 2018 10:43PMरत्नागिरी : प्रतिनिधी

‘एनजीओ’च्या कामकाजात चुका काढून प्रकल्प बंद करतो, असे धमकावून ‘एनजीओ’ चालकाकडून दरमहा 5 हजार रुपये याप्रमाणे वर्षभराचे 60 हजार रुपये लाचेची मागणी रत्नागिरी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या कार्यक्रम व्यवस्थापकाने केली होती. त्यापैकी 25 हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना या व्यवस्थापकास रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवार 9 मे रोजी दु. 1.55 वा. सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात रंगेहाथ पकडले.

सचिन रमेश पवार (वय 40) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. सचिन पवार हा रत्नागिरी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाचा कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून देखरेख करण्याचे काम करतो. त्याच्याविरोधात एका ‘एनजीओ’ चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, तक्रारदार ‘एनजीओ’ चालक हे राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमअंतर्गत ‘एनजीओ’ चालवतात. त्यांना शासकीय अनुदान असून त्यांच्या कामावर देखरेख करणे ही जबाबदारी सचिन पवार याच्याकडे आहे. तक्रारदाराच्या ‘एनजीओ’च्या कामकाजात चुका काढून प्रकल्प बंद करतो, असे धमकावून त्यांच्याकडे सचिन पवारने दरमहा 5 हजार याप्रमाणे वर्षाचे 60 हजार रुपयांची मागणी केली होती. 

याबाबत ‘एनजीओ’ चालकाने काही दिवसांपूर्वी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यावरून बुधवारी (दि. 9) लाचलुचपत विभागाने जिल्हा रुग्णालयात सापळा रचला होता. दुपारी 1.55 वा. सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात मेनगेट जवळील पार्किंगमध्ये ‘एनजीओ’ चालकाकडून 60 हजारपैकी 25 हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना लोकसेवक सचिन पवारला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सतीश गुरव, पोलिस हवालदार संदीप ओगले, दिनेश हरचकर, पोलिस नाईक नंदकिशोर भागवत यांनी केली.